दुचाकींच्या धडकेत चौघेजण जखमी, वाई पोलीस ठाण्यात फिर्याद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 12:01 IST2019-05-03T11:59:54+5:302019-05-03T12:01:57+5:30
मेणवली-वाई रस्त्यावर दोन दुचाकींच्या धडकेत एक गंभीर तर तिघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. याप्रकरणी रत्ना दत्तात्रय तुपे (रा. वासोळे, ता. वाई) यांनी वाई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दुचाकींच्या धडकेत चौघेजण जखमी, वाई पोलीस ठाण्यात फिर्याद
वाई : मेणवली-वाई रस्त्यावर दोन दुचाकींच्या धडकेत एक गंभीर तर तिघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. याप्रकरणी रत्ना दत्तात्रय तुपे (रा. वासोळे, ता. वाई) यांनी वाई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत वाई पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, मंगळवार दि. ३० रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास रत्ना तुपे, त्यांचे पती दत्तात्रय तुपे व मुलगी दर्शना हे वडापावचा गाडा बंद करून गावी निघाले होते. त्यावेळी दत्ता प्रकाश सूर्यवंशी (रा. बालेघर, ता. वाई) हे मेणवलीकडून वाईच्या दिशेने दुचाकीवरुन येत होते. त्यावेळी दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये दत्ता सूर्यवंशी हे गंभीर जखमी झाले. तर तुपे कुटुंबीय किरकोळ जखमी झाले. गंभीर जखमी सूर्यवंशी यांच्यावर वाई येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चहाच्या बहाण्याने आलेल्या युवकाने गंठण लांबविले
शिरवळ : खंडाळा तालुक्यातील हॉटेल व्यावसायिक विवाहितेच्या गळ्यातील १३ ग्राम वजनाचे गंठण अज्ञात युवकाने चहा घेण्याचा बहाणा करून चोरून नेले. याप्रकरणी शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी, भोळी, ता. खंडाळा याठिकाणी प्रिया सचिन कदम यांचे हॉटेल आहे. गुरुवार, दि. २ मे रोजी प्रिया कदम या हॉटेलवर असताना अंदाजे ३५ वर्षे वयाच्या युवकाने चहा देण्याची मागणी केली. प्रिया कदम या चहा बनविण्यासाठी बाहेर ठेवलेल्या जारमधील पाणी घेत होत्या.
त्यावेळी संबंधिताने प्रिया कदम यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कदम यांनी रोखले. तरीही गंठणमधील अर्धा हिस्सा युवकाच्या हाती लागला. त्यानंतर त्याने पोबार केला. यावेळी संबंधित युवक हा नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरून लोणंद बाजूकडे पसार झाला. याबाबत शिरवळ पोलीस स्टेशनला प्रिया कदम यांनी तक्रार दिली आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग हजारे हे तपास करीत आहेत.