Satara ZP: विरोधात लढला, विरोधात बसा; भाजपबरोबर जुळणे कठीण !
By नितीन काळेल | Updated: March 14, 2026 16:15 IST2026-03-14T16:15:04+5:302026-03-14T16:15:27+5:30
भाजपवरच उलटला गेम..., राष्ट्रवादी-शिंदेसेना सदस्यांची भूमिका : एकाधिकारशाहीच घातकी ठरण्याची शक्यता

Satara ZP: विरोधात लढला, विरोधात बसा; भाजपबरोबर जुळणे कठीण !
नितीन काळेल
सातारा : सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक काही दिवसांवर आली असून भाजपकडून सत्तेसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. पण, टूरवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष आणि शिंदेसेनेच्या सदस्यांनी आक्रमक होत ‘विरोधात लढला आता विरोधातच बसा’ अशी भूमिका घेतल्याचे समोर येत आहे. यामुळे भाजपबरोबर या दोन्ही पक्षाचे जुळणे कठीण झालेले आहे. तसेच भाजपची सुरुवातीपासूनची एकाधिकारशाहीची भूमिका हीच विरोधी बाकावर बसण्याची वेळही आणू शकते, अशी चर्चाही सुरू झालेली आहे.
सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक एक महिन्यापूर्वी झाली. तसेच निकाल जाहीर होऊनही महिना उलटला आहे. आता २० मार्चला जिल्हा परिषदेच्या कारभारीपदाची निवडणूक होईल. या निवडणुकीसाठी भाजपने स्वतंत्र रणनीती अवलंबली. ‘ऑपरेशन लोटस’चा पर्याय सुरू केला. पण, त्यांच्या पदरी अपेक्षित यश येताना दिसत नाही. त्यातच भाजपचे नेतेही आमचाच अध्यक्ष होणार म्हणत असलेतरी त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेचे सदस्य जाण्याच्या तयारीत नाहीत.
भाजपने प्रयत्न करूनही सध्यातरी २८ च्यावर त्यांचे संख्याबळ जात नाही. तर राष्ट्रवादी २०, शिंदेसेना १५ आणि काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रत्येकी एक असे ३७ जणांचे पाठबळ भाजपच्या विरोधात आहे. तर सत्ता मिळविण्यासाठी ३३ जणांची आवश्यकता आहे. भाजपला आणखी पाच सदस्य जोडावे लागतील. तरच मिनी मंत्रालयावर झेंडा फडकविता येईल. पण, वास्तवात सध्यातरी तशी स्थिती दिसून येत नाही. यामुळे भाजपची घालमेल वाढल्याचे दिसून येत आहे.
निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य टूरवर गेले आहेत. त्यानंतर शिंदेसेनेनेही सावध पवित्रा घेत सदस्यांसाठी पर्यटन घडवण्यास सुरुवात केली. मागील तीन आठवड्यापासून दोन्ही पक्षाचे सदस्य देशाच्या दक्षिण भागात आहेत. या सदस्यांवर दोन्हीही पक्षांचा बारीक वाॅच आहे. कोण काय बोलते, कोणाशी चर्चा करते, कोण काय हालचाली करत आहेत, याविषयी चांगले लक्ष ठेवले जात आहे.
त्यातच टूरवर असलेल्या सदस्यांनी भाजपविरोधात ठाम भूमिका घेतल्याचे दिसते. निवडणुकीत भाजपविरोधात गेलो. लोकांत जाऊन मते मागितली. मग, आता त्यांच्याबरोबर जाऊन सत्ता स्थापन करणे योग्य नाही. जनाधाराचा आदर ठेवण्यासाठी आपण भाजपला सत्तेबाहेरच ठेवू अशी भूमिकाच त्यांनी घेतली आहे. त्यामुळे भाजपचे सत्तास्थापनेचे स्वप्न भंग होण्याची शक्यता अधिक पटीने वाढलेली आहे.
भाजपवरच उलटला गेम...
भाजपने निवडणुकीपूर्वीच महायुती म्हणून एकत्र येण्याबाबत झुलवत ठेवले असा राष्ट्रवादी-शिंदेसेनेचा आरोप आहे. तसेच जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आमचाच होणार हे जाहीर केले. निवडणुकीनंतरही बहुमत नसतानाही भाजपचाच अध्यक्ष आमचाच होणार हे नेत्यांनी सतत बोलून दाखविले आहे. त्यामुळे भाजपची ही रणनीती त्यांच्यावरच उलटण्याची शक्यता वाढली आहे. यामध्ये वरिष्ठ नेत्यांनी लक्ष घातले तरच भाजपच्या हाताला सत्ता लागू शकते. नाहीतर सत्तेबाहेर राहून विरोधकांची भूमिका घ्यावी लागणार आहे.
विरोधात लढायचे; नंतर एकत्र, मग निवडणूक कशाला ?
निवडणूक वेगवेगळी लढायची. जनतेचा काैल घ्यायचा. त्यानंतर सत्तेसाठी एकत्र यायचे. यातून जनमताचा अनादर झाला. मग, निवडणूक कशाला घ्यायची असे राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेतील सदस्य बोलून दाखवू लागले आहेत. आता जिल्हा परिषदेवर सत्ता आणूनच घरी आणि मतदारसंघात जाऊ, अशी भूमिकाही राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेच्या सदस्यांनी घेतल्याचे सांगितले जात आहे.