Satara Crime: कार्यक्रमासाठी मंदिरात गेले, चोरट्यांनी पंधरा तोळे सोने लंपास केले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 17:00 IST2025-08-22T17:00:21+5:302025-08-22T17:00:44+5:30
श्वानपथकासह ठसेतज्ज्ञांचीही मदत

Satara Crime: कार्यक्रमासाठी मंदिरात गेले, चोरट्यांनी पंधरा तोळे सोने लंपास केले
ढेबेवाडी : बंद घराचा दरवाजा उचकटून पंधरा तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना पवारवाडी कुठरे, ता. पाटण येथे घडली. बुधवारी रात्री चोरट्यांनी डल्ला मारल्याने खळबळ माजली आहे. ढेबेवाडी पोलिसात या घटनेची नोंद झाली असून, श्वानपथकासह ठसेतज्ज्ञांचीही मदत घेण्यात आली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पवारवाडी (ता. पाटण) येथे दिनकर कृष्णा पवार पत्नीसमवेत राहतात. पत्नी आजारी असल्याने त्यांना कराड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यामुळे दिनकर पवार हे पंधरा दिवसांपासून घरी एकटेच राहत होते. बुधवारी सायंकाळी येथील श्रीराम मंदिरामध्ये ग्रंथ समाप्तीनिमित्त धार्मिक कार्यक्रम आयोजित केला होता.
त्या कार्यक्रमासाठी पवार हे घराचा दरवाजा कुलूपबंद करून सायंकाळी सहाच्या सुमारास मंदिरात गेले. तेथील धार्मिक कार्यक्रम आणि जेवण करून रात्री नऊ वाजता घरी परतले. यावेळी घराचा समोरचा दरवाजा उघडला असता पाठीमागचा दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले. घरातील साहित्यही अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. त्यामुळे त्यांनी घरातील तिजोरी बघितली असता तिजोरीही उचकटून तिजोरीतील सोने-चांदीसह रोख रक्कमही लंपास केल्याचे पवार यांच्या निदर्शनास आले. त्यांनी शेजारपाजारच्या लोकांना याबाबत माहिती दिली.
यावेळी चोरट्यांनी घराच्या पाठीमागचा लाकडी दरवाजा उचकटून घरात प्रवेश केल्याचे दिसून आले. पवार यांच्या घराच्या मागे शेती असल्याने चोरट्यांनी शेतातूनच घरात प्रवेश केल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, या घटनेत चोरट्याने मणिमंगळसूत्र, कर्णफुले, चेन यासह काही चांदीच्या वस्तूंवरही डल्ला मारला आहे. तर किरकोळ रोकडही लांबवल्याचे पवार यांनी सांगितले.
दरम्यान, या घटनेची नोंद ढेबेवाडी पोलिसांत झाली असून, सहायक पोलिस निरीक्षक डॉ. अमोल डाईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथक तपास करत आहे. यासाठी ठसेतज्ज्ञ आणि श्वानपथकाचीही मदत घेण्यात आली.