Satara: काळजला महामार्गाच्या कडेलाच भरते मंडई, सहापदरीकरणामुळे वाहनांचा वेग वाढल्याने अपघाताची भीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 18:00 IST2025-11-28T17:58:31+5:302025-11-28T18:00:37+5:30
अपघात टाळण्यासाठी वेळीच उपयोजना कराव्यात अशी मागणी

Satara: काळजला महामार्गाच्या कडेलाच भरते मंडई, सहापदरीकरणामुळे वाहनांचा वेग वाढल्याने अपघाताची भीती
सचिन गायकवाड
तरडगाव : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या सहापदरीकरणामुळे वाहतुकीबरोबर वाहनांचा वेग वाढला आहे. यामुळे अपघाताच्या घटना घडू लागल्या आहेत. एखादा मोठा अपघात कधी होईल हे सांगता येणार नाही, अशी परिस्थिती काही ठिकाणी आहे. मार्गातील काळज येथे रस्त्यालगत भरणाऱ्या भाजी मंडईमुळे अपघाताची दुर्घटना घडू शकते, अशी भीती नागरिक व प्रवाशांतून व्यक्त होत आहे.
लोणंद-फलटण मार्गातील काळज या ठिकाणी परिसरातील शेतकरी, व्यावसायिक रस्त्यालगतच भाजी विक्री करताना दिसत आहेत. खरं तर पालखी मार्गावर अशा पद्धतीने भाजीमंडई भरणे धोक्याचे आहे. विक्रेते हे मोठी जोखीम पत्करून स्वतःच्या जबाबदारीवर विक्री करीत असल्याचे बोलले जात आहे. खरेदी करण्यासाठीही ये-जा करणारे गर्दी करीत असल्याचे दिसते. भविष्यात अपघाताची मोठी घटना होऊ शकते याची जाणीव असतानाही याकडे कानाडोळा केला जात आहे.
वाचा : खंडाळा परिसर ठरतोय अपघातांचा ‘ब्लॅक स्पॉट’; 'या' थांब्यांवर दुर्घटनेचे सावट
मागील काही दिवसांत मार्गातील विविध ठिकाणी अपघाताच्या घटना घडून काहींना जिवास मुकावे लागले आहे. यामध्ये वेगमर्यादा, काही ठिकाणी कामाची चुकीची पद्धत, तर वाहनांचा ताबा सुटल्याने अपघात घडल्याचे समोर आले आहे. रस्त्याच्या कामामुळे मार्गावरील प्रवास कमी वेळेत होत असला तरी होणाऱ्या दुर्घटना नजरेआड करून चालणार नाहीत. यासाठी अपघात टाळण्यासाठी वेळीच उपयोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.