Satara: शेतकऱ्यांनी खर्डा-भाकरी खाली, एकाने प्रशासनाच्या दारातच अंघोळ केली; कराडात दिवाळीचा पहिला दिवस आंदोलनाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 17:02 IST2025-10-21T17:01:46+5:302025-10-21T17:02:05+5:30
कराड (जि. सातारा) : सोयाबीनला हमीभावाप्रमाणे दर मिळत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याचा निषेध ...

Satara: शेतकऱ्यांनी खर्डा-भाकरी खाली, एकाने प्रशासनाच्या दारातच अंघोळ केली; कराडात दिवाळीचा पहिला दिवस आंदोलनाचा
कराड (जि. सातारा) : सोयाबीनला हमीभावाप्रमाणे दर मिळत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याचा निषेध म्हणून दिवाळीच्या पहिल्या दिवशीच कराडच्या उपनिबंधक कार्यालयासमोर खर्डा-भाकरी खात शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध करीत आंदोलन केले. त्याचबरोबर शासनाने सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र त्वरित सुरू करावीत, अशी मागणी त्यांनी केली.
कराड येथील उपनिबंधक कार्यालयासमोर सोमवारी सकाळी शेतकरी कामगार पक्ष, बळीराजा शेतकरी संघटना व राष्ट्रीय समाज पक्ष यांचे कार्यकर्ते एकत्रित आले. त्यांनी सोयाबीनला रास्त भाव द्या, हमीभाव केंद्रे त्वरित सुरू करा, अशा घोषणा देत आंदोलनाला सुरुवात केली. त्याचवेळी दिवाळीच्या पहिल्याच दिवशी घरातून आणलेली खर्डा भाकरी हातात घेऊन ती खात सरकारचा निषेध केला. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. समीर देसाई, बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव, ॲड. अमित लाड, संजय जाधव, अरुण डुबल, संजय जगताप आदी शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते.
सोयाबीन खरेदी हमीभाव केंद्र शासनाने सुरू केलेली नाहीत. शासनाने ५ हजार ३०० हमीभाव सांगितला आहे. मात्र व्यापाऱ्यांकडून प्रत्यक्ष ४ हजार रुपये दराने सोयाबीन खरेदी होत आहे. हा शेतकऱ्यांवर फार मोठा अन्याय होत आहे. -ॲड. समीर देसाई, जिल्हाध्यक्ष, शेतकरी कामगार पक्ष
पहिली आंघोळ प्रशासनाच्या दारात !, आंदोलनाची दखल न घेतल्याने प्रशासनाचा निषेध
कराड : कापील (ता. कराड) गावातील रहिवासी नसणाऱ्या अनेकांनी बनावट आधारकार्ड तयार करून मतदान यादीत नावे नोंदवली व त्यांनी विधानसभेला बोगस मतदानही केले आहे. त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत, यासाठी सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांचे कराडच्या प्रशासकीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे. मात्र, याबाबत प्रशासनाने कुठलीही दखल न घेतल्याने सोमवारी त्यांनी दिवाळीची पहिली आंघोळ प्रशासनाच्या दारात करून प्रशासनाचा निषेध केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कापील येथे बाहेरच्या काही लोकांनी विधानसभेच्या मतदार यादीमध्ये आपली नावे नोंदवल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनी केली होती. त्याचा पाठपुरावा करून या लोकांनी बनावट आधारकार्ड बनवल्याचे त्यांनी समोर आणले. त्याचबरोबर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कराड तालुक्याच्या मतदार यादीमध्ये त्यांची नावे वाढवताना पूर्वीच्या ठिकाणांची नावे कमी झाली आहेत की नाही, याची खात्री केली नाही, अशी त्यांची तक्रार आहे.
आता या बोगस मतदान करणाऱ्या लोकांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत त्यांनी गेल्या १२ दिवसांपासून कराडच्या प्रशासकीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. मात्र, या आंदोलनाची प्रशासनाने गंभीरपणे दखल घेतलेली नाही, असा आरोप करत त्यांनी सोमवारी सकाळी दिवाळीची पहिली आंघोळ प्रशासनाच्या दारात करत प्रशासनाचा निषेध केला.
बोगस मतदानासंदर्भात माझे सध्या धरणे आंदोलन सुरू आहे. प्रशासन याची गांभीर्याने दखल घेत नाही, हे माझ्या लक्षात आले आहे. म्हणूनच आज, दिवाळीची पहिली आंघोळ मी प्रशासनाच्या दारात करून त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. यातूनही काही सुधारणा न झाल्यास दिवाळीनंतर आमरण उपोषण सुरू करणार आहे. - गणेश पवार, सामाजिक कार्यकर्ते