Satara: पाऊस थांबला तरी कास धरणाच्या सांडव्यावरून वाहतंय पाणी; पर्यटकांची गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 17:09 IST2025-10-08T17:09:21+5:302025-10-08T17:09:39+5:30
कास धरण १९ जूनला झाले होते ओव्हरफ्लो

Satara: पाऊस थांबला तरी कास धरणाच्या सांडव्यावरून वाहतंय पाणी; पर्यटकांची गर्दी
पेट्री : सातारा शहराला पाणीपुरवठा करत असलेले कास धरण यंदाच्या वर्षी गुरुवार, दि. १९ जूनला पूर्ण क्षमतेने भरले होते. अधूनमधून पडणाऱ्या पावसाने धरणाच्या सांडव्यावरून मोठ्या क्षमतेने वाहणारे पाणी गेल्या साडेतीन महिन्यांपासून म्हणजेच सलग ११० दिवस वाहतानाचे मनमोहक चित्र पाहावयास मिळत आहे.
कास परिसरातील अधूनमधून पावसाची संततधार व गेल्या पावणेचार महिन्यापासून सलग ओव्हरफ्लो झाले. कास धरणामुळे देशातील एक नंबरचा भांबवली येथील वजराई धबधबादेखील मोठ्या प्रमाणावर कोसळतानाचे चित्र होते. यावर्षी जून महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावत पडलेल्या मुसळधार पावसातच धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली होती. दरम्यान, कास धरण १९ जूनला ओव्हरफ्लो झाले.
यावर्षी जूनमध्ये मान्सूनपूर्व पावसाने कास परिसरात चांगली हजेरी लावली होती. यामुळे सलग दहा-बारा दिवसांच्या जोरदार पावसामुळे कास धरण १९ जूनला पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले होते. १९ जूनपासून आजवर देखील सलग साडेतीन महिन्यांपासून कास धरणाच्या सांडव्यावरून कमी-जास्त प्रमाणात पाणी वाहतच आहे. सततच्या रिमझिम पावसाने सड्यावरून कोसळणारे पाणी यामुळे कास धरणात पाणीसाठा होऊन सद्य:स्थितीला सांडव्यावरून कमी-जास्त प्रमाणात पाणी सतत वाहत आहे. तसेच धुकेदेखील मोठ्या प्रमाणावर पडत आहे.
हिरवागार निसर्ग वेधतोय पर्यटकांचे लक्ष
हिरवागार निसर्ग, दाट धुक्याची दुलई त्यात रिमझिम पडणारा पाऊस नेहमीच पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो. या नयनरम्य निसर्गात आणखी भर टाकणारा कास धरणाचा सांडवा. सांडव्यावरून वाहणारे पाणी कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी दरवर्षी पर्यटक परिसरात पर्यटनाला पसंती देत असतात.
दहा वर्षांतील आकडेवारी
२०१५ : २३ जून
२०१६ : ३ जुलै
२०१७ : ३० जूनला
२०१८ : ५जुलै
२०१९ : ६जुलै
२०२० : ४ जुलै
२०२१ : १७ जून
२०२२ : १५ जुलै
२०२३ : २४ जुलै
२०२४ : ७ जुलै
१९ जूनला कास धरण ओव्हरफ्लो झाले. गेल्या साडेतीन महिन्यांपासून पावसाची रिमझिम सतत सुरू आहे. तसेच उरमोडी नदीचा उगम व तलावातील पुष्कळ झऱ्यामुळे आजमितीलादेखील सलग ११० दिवस कास धरणाच्या सांडव्यावरून कमी-जास्त प्रमाणात पाणी वाहत आहे. पूर्णपणे पाऊस उघडल्यानंतर साधारण आठ-दहा दिवसांनंतर सांडव्यावरून वाहणारे पाणी थांबते. - जयराम कीर्दत, पाटकरी. कास धरण