पावसाचा जोर कमी, तरी धरणांत पाण्याची आवक कायम; सातारा जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पात १०२ टीएमसी पाणीसाठा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 19:20 IST2025-07-09T19:20:03+5:302025-07-09T19:20:29+5:30
कोयना, नवजा येथे किती झाला पाऊस..

पावसाचा जोर कमी, तरी धरणांत पाण्याची आवक कायम; सातारा जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पात १०२ टीएमसी पाणीसाठा
सातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असलातरी प्रमुख धरणांत पाण्याची आवक कायम आहे. यामुळे कोयनासह प्रमुख सहा प्रकल्पांत १०२ टीएमसीहून अधिक पाणीसाठा झाला आहे. सध्या ही धरणे सुमारे ६९ टक्के भरलीत. यामुळे चिंता मिटलेली आहे. तर २४ तासात कोयनेला ४२ आणि नवजा येथे ३३ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात तीन आठवड्यांपासून पाऊस सुरूच आहे. या पावसामुळे पश्चिम भाग आबादाणी झाला आहे. तसेच पश्चिम भागातच कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी हे मोठे प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची एकूण पाणीसाठवण क्षमता १४८.७४ टीएमसी आहे. जून महिन्याच्या मध्यापासून पाऊस सुरू झाल्यापासून या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढला.
बुधवारी सकाळच्या सुुमारास या धरणांमध्ये १०२.३६ टीएमसी पाणीसाठा झाला होता. याची टक्केवारी ६८.८२ इतकी झाली आहे. कोयना धरणात ७१.१२ टीएमसी तर धोममध्ये ९.७०, बलकवडी २.०४, कण्हेर ७.४२, तारळी ४.९९ आणि उरमोडी धरणात ७.०९ टीएमसी पाणीसाठा होता. धोम ७२ तर तारळी धरण ८५ टक्के भरलेले आहे. त्याचबरोबर सध्या चार धरणांतून पाणी विसर्ग सुरूच आहे.
बुधवारी सकाळच्या सुमारास कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून २ हजार १०० क्यूसेक विसर्ग केला जात होता. तर कण्हेरमधून २ हजार ३१४, उरमोडी धरणातून १ हजार ८२८ आणि तारळीमधून २ हजार ३७७ क्यूसेक विसर्ग नदीपात्रात केला जात होता. यामुळे वेण्णा, तारळी आणि उरमोडी नदीच्या पाणीपातळीतही वाढ झालेली आहे. तसेच पावसाचा जोर कमी झाल्याने विसर्गही घटण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
कोयनेला २१०६ मिलिमीटर पर्जन्यमान..
जिल्ह्यात पावसाळा सुरू झाल्याने सवा महिना झाला आहे. तर बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ४२, नवजाला ३३ आणि महाबळेश्वर येथे २१ मिलिमीटर पाऊस झाला. तर एक जूनपासून कोयनेला २ हजार १०६, नवजा १ हजार ८९१ आणि महाबळेश्वरमध्ये १ हजार ९६१ मिलिमीटर पर्जन्यमान झाले आहे. बुधवारी सकाळी कोयना धरणात सुमारे १५ हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. पाणी आवक कमी झाली आहे. तर धरणात ७१.११ टीएमसी साठा झाला होता. ६७.५६ टक्के हा साठा आहे.