Satara- Phaltan Doctor Death: हॉटेलचे डीव्हीआर जप्त, मग सीसीटीव्ही फुटेज बाहेर कसे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 13:20 IST2025-10-31T13:19:36+5:302025-10-31T13:20:38+5:30
घटनाक्रम समोर आल्याने नवे प्रश्न उपस्थित

Satara- Phaltan Doctor Death: हॉटेलचे डीव्हीआर जप्त, मग सीसीटीव्ही फुटेज बाहेर कसे?
प्रशांत रणवरे/मुराद पटेल
जिंती : फलटण येथील पीडिता डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचे नवीन कंगोरे समोर येऊ लागले आहेत. उद्धवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलेल्या आरोपानंतर हॉटेलमालकांनी पत्रकार परिषद घेऊन सीसीटीव्ही फुटेज दाखविले. हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यादिवशीचा घटनाक्रम दाखविण्यात आल्याने नव्याने काही प्रश्न निर्माण झाले आहेत. घटनेच्या तपासकामी हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजचा डीव्हीआर पोलिसांनी जप्त केला होता. मग हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज बाहेर आले कसे? यासह अनेक प्रश्न नव्याने उपस्थित झाले आहेत.
फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने व पीडिता राहत असलेल्या घर मालकांचा मुलगा प्रशांत बनकर यांना अटक झाली. त्यानंतर सुषमा अंधारे यांच्याकडून माजी खासदार रणजित नाईक-निंबाळकर यांच्यासह हॉटेल प्रशासनावर गंभीर आरोप करण्यात आले. त्यामुळे हॉटेल प्रशासनाने आपली बाजू पत्रकार परिषद घेऊन मांडली.
हॉटेल प्रशासनाने घटनेच्या दिवशीचे काही सीसीटीव्ही फुटेज पत्रकार परिषदेत दाखविले. त्यानंतर सदरील सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे अनेक नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. एकीकडे घटनेच्या तपासाच्यादृष्टीने हॉटेलमधील सीसीटीव्ही डीव्हीआर पोलिसांनी जप्त केल्याचे सांगण्यात आले. मग, घटनेचे सीसीटीव्ही फुटेज बाहेर आले कसे?असा प्रश्न उपस्थित झाला. या गोष्टीचा तपास फलटण पोलिसांकडून करण्यात येईल का? सीसीटीव्ही फुटेजमुळे आणखी संशयाचे वातावरण तयार झाले असून, डॉक्टर असोसिएशनने या प्रकरणाची न्यायालयाच्या नियंत्रणाखाली एसआयटी स्थापन करीत तपास करण्याची मागणी केली आहे.
आत्महत्येपूर्वी नेमके काय घडले?
आत्महत्या केलेल्या फलटण येथील महिला डॉक्टरच्या हातावरील मजकुराबाबत बहिणीकडून शंका उपस्थित करण्यात आली आहे. हस्ताक्षराचा उलगडा हस्ताक्षरतज्ज्ञांच्या अहवालानंतरच होईल. या अहवालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. त्यामुळे आत्महत्यापूर्वी नेमके काय घडले? याचा उलगडा होण्यास मदत होणार आहे.
हॉटेलमध्ये पीडिता असताना सीसीटीव्ही फुटेज हे त्यांचं ओपन डॉक्युमेंट होतं. त्यावेळी त्यांनी सीसीटीव्ही फुटेज काढून घेतले असेल. घटनेनंतर पीडितेला दवाखान्यात घेऊन जाणे, पीएम करणे व गुन्हा दाखल करून घेण्यापर्यंत सीसीटीव्ही फुटेजचे डीव्हीआर जप्त झालं नव्हतं. त्यावेळी ते त्यांच्या ताब्यात होते. त्यावेळचे फुटेज त्यांनी पत्रकार परिषदेत दाखविले असेल, याबाबत मी निश्चित सांगू शकत नाही. एकदा आमच्या ताब्यात डीव्हीआर आल्यानंतर त्यांच्याकडे जाण्याचा प्रश्नच येत नाही. - विशाल खांबे, उपविभागीय पोलिस अधिकारी, फलटण