अंतर्गत बंडाळीमुळे राष्ट्रवादी चक्रव्यूहात

By Admin | Updated: September 15, 2014 23:26 IST2014-09-15T21:32:15+5:302014-09-15T23:26:16+5:30

जयकुमार गोरे : नूतन उपसभापती अतुल जाधव यांचा सत्कार

Due to internal turbulence, Nationalist Movement | अंतर्गत बंडाळीमुळे राष्ट्रवादी चक्रव्यूहात

अंतर्गत बंडाळीमुळे राष्ट्रवादी चक्रव्यूहात

खटाव : माण तालुका पंचायत समिती पदाधिकारी निवडीमध्ये घडलेल्या नाट्यमय घडामोडी आणि आ. जयकुमार गोरे यांनी टाकलेल्या चक्रव्यूहात राष्ट्रवादी अलगद अडकल्याने एक सदस्य अनुपस्थित असूनही काँग्रेसच्या अतुलशेठ जाधव यांची उपसभापतिपदी निवड झाली. आ. गोरेंच्या खेळीने जिल्हा परिषद सदस्य अनिल देसार्इंची विकेट निघाली, तर माजी आ. सदाशिव पोळ यांना विचारात पाडले. काल, रविवारी घडलेल्या घडामोडींमुळे काँग्रेसने एका दगडात अनेक पक्षी मारल्याचीच चर्चा रंगली आहे.
माण पंचायत समितीमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीचे प्रत्येकी पाच सदस्य निवडून आले आहेत. सभापतिपदी राष्ट्रवादीच्या उमेदवाराची वर्णी लागली. काँग्रेसचे एक सदस्य अनुपस्थित असल्याचा फायदा राष्ट्रवादीला झाला. उपसभापतिपदीही तशीच परिस्थिती राहील, असा सर्वांचा अंदाज होता. मात्र, उपसभापती निवडीत राष्ट्रवादी अंतर्गत बंडाळीने उचल खाल्ली. राष्ट्रवादीच्या एका सदस्याला काँग्रेसच्या सदस्याने सुचक म्हणून सही केली होती. उपसभापती निवडीत मदत करण्याचे आश्वासन राष्ट्रवादीच्या त्या सदस्याने दिले होते. मात्र, व्हायचे तेच झाले. ऐनवेळी शब्द फिरवण्यात आला. तिथेच काँग्रेसच्या सदस्यांनी मुत्सद्देगिरी दाखविली. उपसभापती निवडीत काँग्रेसच्या चार व राष्ट्रवादीच्या एका महिला सदस्याने अतुल जाधवांच्या पारड्यात मत टाकले. आ. जयकुमार गोरेंनी टाकायचा म्हणून टाकलेल्या चक्रव्यूहात राष्ट्रवादी अलगद अडकली. काँग्रेसला उपसभापतिपदाची संधी मिळाली. ज्या सदस्याने स्वत:ची पोळी भाजण्यासाठी सर्वाधिक हालचाली केल्या त्याच राष्ट्रवादीच्या सदस्यांना तोंडघशी पडावे लागले.
काँग्रेसचा एक सदस्य अनुपस्थित असूनही अतुल जाधव यांची उपसभापतिपदी निवड होताच कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. या निवडीबाबत आ. गोरे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते म्हणाले, ‘आमचा पराभव आम्ही पूर्वीच मान्य केला आहे. या पदाधिकारी निवडीमध्ये आम्हाला स्वारस्यही नव्हते; मात्र समोरून विनाकारण डाव खेळले गेले. विरोधकांच्या अंतर्गत बंडाळीमुळेच राष्ट्रवादी आमच्या चक्रव्यूहात अडकली.
उपसभापतिपदी निवड झालेल्या अतुल जाधव यांचा आ. जयकुमार गोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आ. गोरेंच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या संधीचा पुरेपूर वापर करून सर्वसामान्य जनतेची कामे मार्गी लागणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.
कार्यक्रमास अर्जुन काळे, सोमनाथ भोसले, जिल्हा परिषद सदस्या शीला पोळ, मीनाक्षी काळे, पंचायत समिती सदस्या स्मिता वायदंडे, बाबासाहेब हुलगे, सुवर्णा पवार, आनंदराव वीरकर, राजू पोळ, प्रशांत वायदंडे, प्रताप भोसले, सुभाषशेठ जाधव, लुनेश वीरकर, रमेश कदम, मालोजी मोरे, झुंजारशेठ जाधव, युवक अध्यक्ष सतीश जाधव, धनंजय साळुंखे, दत्ता देशमाने, सरपंच धनाजी जाधव, बाळासाहेब कोळेकर, रवी सकुंडे, संदीप जाधव, विजय जाधव, सयाजी मोरे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Due to internal turbulence, Nationalist Movement