पर्यटकांमधून स्ट्रॉबेरीला मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:35 IST2021-03-22T04:35:45+5:302021-03-22T04:35:45+5:30

महाबळेश्वर : ‘स्ट्रॉबेरी लॅण्ड’ अशी भौगोलिक ओळख प्राप्त झालेल्या महाबळेश्वरच्या लालचुटूक स्ट्रॉबेरीला पर्यटकांमधून मागणी वाढली आहे. यंदा परतीच्या पावसाने ...

Demand for strawberries from tourists | पर्यटकांमधून स्ट्रॉबेरीला मागणी

पर्यटकांमधून स्ट्रॉबेरीला मागणी

महाबळेश्वर : ‘स्ट्रॉबेरी लॅण्ड’ अशी भौगोलिक ओळख प्राप्त झालेल्या महाबळेश्वरच्या लालचुटूक स्ट्रॉबेरीला पर्यटकांमधून मागणी वाढली आहे. यंदा परतीच्या पावसाने तालुक्यात स्ट्रॉबेरी रोपांची लागवड उशिरा झाली. शिवाय कोरोनामुळे परदेशातून रोपांची आयातही कमी झाली. संकटांचा सामना करत शेतकऱ्यांकडून स्ट्रॉबेरी लागवड करण्यात आली. सध्या स्ट्रॉबेरी प्रति किलो १५० ते २०० रुपये या दराने विकली जात आहे. दर कमी झाल्याने मागणीत वाढ झाली आहे. तालुक्यातील भिलार, अवकाळी, नाकिंदा, मेट गुुताड, पाचगणी, बोंडारवाडी, माचूतर, गुरेघर येथील शेतकऱ्यांनी यंदा नाबीला, कॅमारोजा, विंटर डाऊन व स्वीटचार्ली जातीच्या स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे.

व्हॉल्व्हला गळती;

पाण्याचा अपव्यय

सातारा : शहरातील शनिवार पेठ, बुधवार नाका, शाहू चौक व देवी चौकात असलेल्या व्हॉल्व्हला गेल्या अनेक दिवसांपासून गळती लागली आहे. या व्हॉल्व्हची पालिकेकडून दुरुस्ती केली जात नसल्याने दररोज मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. उन्हाळा सुरू झाल्याने पालिका प्रशासन पाणी बचतीचे नियोजन करीत आहे. अशा परिस्थितीत व्हॉल्व्हमधून पाणी वाया जात असल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे. पालिकेने दुरुस्तीचे काम हाती घेऊन पाण्याचा अपव्यय थांबवावा, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

वाईतील पुलावर

वाहतुकीची कोंडी

वाई : येथील महागणपती मंदिराजवळील जुन्या पुलावर वाहतुकीची सातत्याने कोंडी होत आहे. अनेक फळविक्रेते रस्त्याकडेला व्यवसाय करीत असल्याने अनेक वाहनधारक गाडी पुलावर उभी करून खरेदी करत असतात. त्यामुळे वाहतूककोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. याचा पादचाऱ्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागतो. पालिका प्रशासनाने याबाबत तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Web Title: Demand for strawberries from tourists