Satara: आजारी वडिलांसाठी ‘त्याने’ चोरले महिलेचे मंगळसूत्र!, पोलिसांच्या तपासात उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 15:47 IST2025-08-14T15:47:27+5:302025-08-14T15:47:47+5:30

पहिलीच चोरी अन् तिही रंगेहाथ सापडली

Citizens caught a young man red handed stealing a woman mangalsutra in Satara and handed him over to the police | Satara: आजारी वडिलांसाठी ‘त्याने’ चोरले महिलेचे मंगळसूत्र!, पोलिसांच्या तपासात उघड

संग्रहित छाया

सातारा : अनेकांना परिस्थिती अक्षरश: हात टेकायला लावते. त्यावेळी चांगल्या वाटेवर जाण्याऐवजी काही जण चुकीचा मार्ग निवडतात. असाच काहीसा किस्सा एका ३० वर्षीय तरुणाच्या बाबतीत घडलाय. एका महिलेचे मंगळसूत्र चोरताना नागरिकांनी रंगेहात पकडून तरुणाला पोलिसांच्या हवाली केले. त्यावेळी त्याने मंगळसूत्र चोरण्याचे कारण पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिस थोडे भावनिक झाले; पण कायद्याच्या दृष्टीने त्याने केलेली चूक भरून न निघणारी आहे. त्यामुळे त्याला कायद्याची परीक्षा द्यावीच लागणार.

सातारा शहरातील शाहू कला मंदिर परिसरात सोमवारी रात्री आठ वाजता एक तिशीतील तरुण घुटमळत होता. कोणत्या महिलेच्या गळ्यात दागिने आहेत, याची तो पाहणी करत होता. दोन महिला चालत आल्याचे दिसल्यानंतर त्याने पाठीमागून महिलेच्या गळ्यात हात घातला. त्याने मंगळसूत्र हिसकावलेही. तो धावतच सुटला; परंतु महिलांनी आरडाओरड केल्याने इतर नागरिक सावध झाले अन् त्याला रंगेहात पकडण्यात आले. शाहूपुरी पोलिस घटनास्थळी आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. सातारा शहरात यापूर्वी बऱ्याच घटना अशा प्रकारच्या घडल्या आहेत. त्यामुळे या तरुणाची पोलिसांनी कसून चाैकशी सुरू केली. त्यावेळी पोलिसांना त्याच्या चाैकशीतून वेगळीच माहिती समजली. 

त्या तरुणाचे वडील घरी आजारी असतात. अनेकदा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. लाख, दोन लाख रुपये खर्च आल्याचे तो सांगतो. हातउसनेही पैसे अनेकांकडून घेतले. साताऱ्यातील एमआयडीसीतील एका कंपनीत १५ हजारांच्या पगारावर नोकरी करत असतानाही त्यातून भागत नव्हते. त्यामुळे कोणताच मार्ग माझ्यासमोर नव्हता असे तो तरुण सांगतोय. मंगळसूत्र चोरी करून किमान हातउसने घेतलेले पैसे तरी देता येतील, यासाठी त्याने चुकीचा मार्ग निवडला. याचा त्याला पश्चात्तापही झाल्याचे पोलिस सांगताहेत; पण त्याने केलेला गुन्हा हा जबरी चोरीमध्ये मोडतो. त्यामुळे त्याची आर्थिक परिस्थिती चांगली नाही म्हणून चोरीचा मार्ग स्वीकारला, हे कायदा मान्य करणार नाही. परिणामी, त्याने केलेल्या गुन्ह्याची परीक्षा त्याला द्यावी लागणारच, असे पोलिस सांगताहेत.

Web Title: Citizens caught a young man red handed stealing a woman mangalsutra in Satara and handed him over to the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.