जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर छापासत्र

By Admin | Updated: July 4, 2014 00:26 IST2014-07-04T00:23:23+5:302014-07-04T00:26:15+5:30

पन्नास जणांना अटक : ४५ हजारांचा दंड वसूल; तीस हजारांचा ऐवज हस्तगत

Charged on illegal businesses in the district | जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर छापासत्र

जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर छापासत्र

सातारा : पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या आदेशानुसार पोलिसांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैध व्यवसायांवर छापे टाकून तब्बल पन्नास जणांना अटक केली. त्यांच्याकडून तीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, ४५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
जिल्ह्यातील विविध ठिकाणी एकाच वेळी हे छापे घालण्यात आले. या अवैध धंद्यांमध्ये जुगार, दारू अड्डे आणि मोटार वाहन कायद्याप्रमाणे केलेल्या कारवाईचा समावेश आहे. जिल्ह्यात विविध १५ ठिकाणी अवैध जुगार, मटका अड्ड्यांवर छापे टाकण्यात आले. या कारवाईत २५ जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ८ हजार ३६६ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. तसेच विविध १५ ठिकाणी दारूअड्ड्यांवर छापा टाकून २५ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून १०५.३९ लिटर देशी-विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. त्याची किंमत २० हजार ७०७ रुपये इतकी आहे.
गाडीचा परवाना नसणे, कागदपत्र अपूर्ण असणे, भरधाव गाडी चालविणे अशा कारणांवरून जिल्ह्यातील ४४ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून ४५ हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. अवैध व्यवसायांसंदर्भात कोणास माहिती असल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Charged on illegal businesses in the district