चंदा' है तू, अब 'तारा' भी तू! चांदोली जंगल की 'राणी' है तू!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 12:43 IST2025-11-22T12:43:14+5:302025-11-22T12:43:58+5:30
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढवण्याचा उद्देशाने ताडोबा उद्यानातील पकडलेली तरुण वाघीण नुकतीच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात चांदोली येथे सोडण्यात आली.

चंदा' है तू, अब 'तारा' भी तू! चांदोली जंगल की 'राणी' है तू!
प्रमोद सुकरे
लोकमत न्यूज नेटवर्क
कराड -सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढवण्याचा उद्देशाने ताडोबा उद्यानातील पकडलेली तरुण वाघीण नुकतीच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात चांदोली येथे सोडण्यात आली. हा एक ऐतिहासिक टप्पा या माध्यमातून पूर्ण झाला आहे. पण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडलेली ही वाघीण 'चंदा' की 'तारा' असा प्रश्न अनेकांना पडतोय.पण ही दोन्हीही नावे बरोबरच आहेत. म्हणून तर 'चंदा' है तू ,अब 'तारा' भी तू; चांदोली जंगल की राणी है तू!असे गर्वाने म्हणावे लागते.
खरंतर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढवण्यासाठी इतर व्याघ्र प्रकल्पातून वाघ आणणे आवश्यक होते. यासाठी व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्नही केले. मग कुठे पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाने ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प व पेंच व्याघ्र प्रकल्प येतील ३ नर व ५ मादी अशा ८ वाघांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थलांतर करण्यासाठी मंजुरी दिली.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या दृष्टीने खरं तर हा एक महत्त्वाचा टप्पा होता. मग महाराष्ट्र वन विभागाने त्याला 'ऑपरेशन तारा' असे नाव दिले.व्याघ्र संवर्धन उपक्रमा अंतर्गत ताडोबा येथील टी-२०-एस -२ या तरुण वाघिणीचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात यशस्वीपणे स्थलांतर केले . शुक्रवारपासून या वाघिणीने चांदोली जंगलात मुक्त संचारही सुरू केला आहे. त्यामुळे याची चर्चा आता सर्वत्र सुरू झाली आहे.
वाघिणीचा २७ तास पिंजऱ्यातून प्रवास
ताडोबा येथे बुधवार दि. १२ रोजी दुपारी ही तरुण वाघीण पकडण्याची मोहीम सुरू झाली. तिला ५ वाजता पिंजऱ्यात बंदिस्त केल्यानंतर वैद्यकीय तपासणी पूर्ण करून रात्री १० वाजता तिचा कराडच्या दिशेने प्रवास सुरू झाला शुक्रवार रात्री १:३० वाजता ती चांदोली येथे दाखल झाली. या दरम्यान तिने तब्बल २७ तास पिंजऱ्यातून प्रवास करत१ हजार किलोमीटरचे अंतर पार केले.
व्याघ्र पर्यटन वाढेल
राज्य शासन, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, चांदोली राष्ट्रीय उद्यान व भारतीय वन्य जीव संस्था यांच्या एकत्रित सहकार्याने व्याघ्र पुनर्वसन व संवर्धनाची दिशा यामुळे अधिक भक्कम होत आहे. पर्यावरण संरक्षण व जैवविविधतेच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. आता भविष्यात येथे व्याघ्र पर्यटन वाढ होण्यासाठी निश्चितच मदत होऊ शकते.
चांदोली येथे आणलेली ही वाघीण ताडोबा येथून आणली आहे. ती ताडोबामध्ये असताना तिची ओळख 'चंदा'अशी होती. आता ऑपरेशन 'तारा'च्या माध्यमातून तिला इकडे आणल्याने तिला 'तारा' अशी नवीन ओळख देण्यात आली आहे. पण 'चंदा' व 'तारा' ही दोन्ही नावे या एकाच वाघिणीची आहेत.रोहन भाटे
मानद वन्यजीव रक्षक