दंड, व्याज माफ करण्यासाठी लाचेची मागणी; जीएसटीच्या दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 12:38 IST2025-10-04T12:36:41+5:302025-10-04T12:38:44+5:30
२५ हजारांची मागणी केली

संग्रहित छाया
सातारा : जीएसटीवरील दंड तसेच व्याज माफ करण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी राज्य कर निरीक्षक रोहन सतीश देवकर आणि अक्षय मोहन फडतरे (दोघेही रा. देगाव, ता. सातारा) यांच्यावर शुक्रवारी कारवाई करण्यात आली. याप्रकरणी त्या दोघांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
एका व्यावसायिकाचे २०२१-२२ आणि २०२२-२३ या कालावधीतील जीएसटी टू बी आणि थ्री बी मध्ये फरक पडला होता. यामुळे त्या व्यावसायिकास दंड व व्याजाची नोटीस बजावण्यात आली होती. त्या व्यावसायिकाने दंड व त्यावरील व्याज माफ करण्यासाठी सातारा जीएसटी ऑफिसमधील राज्यकर निरीक्षक रोहन देवकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी २५ हजारांची मागणी केली.
याबाबतची तक्रार त्या व्यावसायिकाने नंतर सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे नोंदवली. यानुसार त्या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. पडताळणीत रोहन देवकर यांनी ३० हजारांची मागणी करत २० हजार लाच घेण्याचे मान्य केले. याच कार्यालयातील राज्यकर निरीक्षक अक्षय फडतरे यांनी देखील या प्रकारास प्रोत्साहन दिल्याचे समोर आले. यामुळे त्या दोघांवर लाच मागितल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. याप्रकरणी त्या दोघांवर गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.