सरकारी नोकरीच्या आमिषाने तरुणाची तब्बल १० लाखांची फसवणूक, आरोग्य उपसंचालकावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 20:15 IST2026-01-19T20:15:10+5:302026-01-19T20:15:40+5:30

आणखी एकाचा समावेश : सरकारी नोकरीच्या आमिषाने १० लाखांची फसवणूक

Case registered against Deputy Director of Health for fraud | सरकारी नोकरीच्या आमिषाने तरुणाची तब्बल १० लाखांची फसवणूक, आरोग्य उपसंचालकावर गुन्हा दाखल

सरकारी नोकरीच्या आमिषाने तरुणाची तब्बल १० लाखांची फसवणूक, आरोग्य उपसंचालकावर गुन्हा दाखल

फलटण (जि. सातारा) : सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका तरुणाची तब्बल १० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामकिसन गंगाधर ध्यार व पुण्याचे आराेग्य उपसंचालक डॉ. भगवान अंतू पवार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अभिषेक हणमंत गावडे (वय २४, रा. जावली, ता. फलटण) या तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्या तक्रारीनुसार, ऑक्टोबर २०२५ दरम्यान रामकिसन गंगाधर ध्यार (रा. सरकारी निवासस्थान, आरोग्य केंद्र, वाघोली, ता. हवेली, जि. पुणे) व डॉ. भगवान अंतू पवार यांनी फिर्यादीस आपण डीएमईआर अंतर्गत फार्मासिस्ट पदावर सरकारी नोकरी लावून देऊ, असे सांगून विश्वासात घेतले.

सरकारी नोकरी मिळेल या आशेने फिर्यादीने आरोपींच्या सांगण्यावरून वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने १० लाख रुपये संबंधितांकडे वर्ग केले. मात्र, रक्कम घेतल्यानंतरही फिर्यादीस सरकारी नोकरी मिळाली नाही. याबाबत वारंवार विचारणा करूनही आरोपी टाळाटाळ करू लागले. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी १६ जानेवारी २०२६ रोजी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू असून, आर्थिक व्यवहार, बँक खात्यांची माहिती व डिजिटल पुरावे तपासण्यावर पोलिसांचा भर आहे.

Web Title: Case registered against Deputy Director of Health for fraud