Satara: 'डाळिंब' कंपनीत गुंतवणुकीच्या आमिषाने १ कोटीचा गंडा, दाम्पत्यावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 15:35 IST2025-08-19T15:34:56+5:302025-08-19T15:35:31+5:30
सहा जणांची करण्यात आली फसवणूक

Satara: 'डाळिंब' कंपनीत गुंतवणुकीच्या आमिषाने १ कोटीचा गंडा, दाम्पत्यावर गुन्हा दाखल
सातारा : डाळिंब खरेदी-विक्री कंपनीमध्ये गुंतवलेल्या रकमेवर दर महिना चार टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून सहा जणांची तब्बल १ कोटी ४४ लाखांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात दाम्पत्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार १६ फेब्रुवारी २०२२ ते १४ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत फलटण येथे घडला आहे. विकास बबन सस्ते, मनीषा विकास सस्ते (सध्या रा. सूर्यनगरी, बारामती, मूळ रा. निरगुडी, ता. फलटण) असे गुन्हा दाखल झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे.
याबाबत कृष्णात वसंत जाधव (वय ३७, रा. आसू, ता. फलटण) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, फलटण शहरातील लक्ष्मीनगर येथील एका अपार्टमेंटमध्ये संशयित आरोपी दाम्पत्याने ‘राजलक्ष्मी इंटरप्रायझेस’ या नावाने कंपनी सुरू केली. शेअर मार्केटमध्ये व राजलक्ष्मी इंटरप्रायझेस या डाळिंब खरेदी-विक्री कंपनीमध्ये पैसे गुंतवलेल्या रकमेवर दर महिना ४ टक्के परतावा देतो, असे त्यांनी आमिष दाखवले.
माझ्यासह गणेश वसंतराव जगदाळे (रा. मलठण, ता. फलटण), दीपक जगदाळे (रा. रामबाग, फलटण), संदीप टोणगे (रा. फलटण), दयानंद वाघमोडे (रा. निंभोरे, ता. फलटण), सचिन तावरे (रा. निरगुडी, ता. फलटण) आणि धीरज जाधव (रा. साखरवाडी, ता. फलटण) यांचा विश्वास संपादन करून आरोपींनी नोटरी करारनामा केला. त्यानंतर आम्ही सर्वांनी वेळोवेळी त्यांच्या कंपनीत पैसे गुंतवले. अशाप्रकारे सहा गुंतवणूकदारांची मिळून एकूण १ कोटी ४४ लाख २१ हजार ६५० रुपयांची आरोपी दाम्पत्याने फसवणूक केली.