Satara: शिकारीचा बनाव रचून फलटणमध्ये निर्घृण खून, पोलिसांनी चार तासांत आरोपींच्या मुसक्या आवळल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 16:45 IST2026-01-07T16:45:03+5:302026-01-07T16:45:32+5:30
फलटण (जि.सातारा) : सस्तेवाडी (ता. फलटण) येथील लोंढेवस्ती परिसरात एका ४० वर्षीय व्यक्तीची सशाच्या शिकारीच्या बहाण्याने बोलावून निर्घृण हत्या ...

Satara: शिकारीचा बनाव रचून फलटणमध्ये निर्घृण खून, पोलिसांनी चार तासांत आरोपींच्या मुसक्या आवळल्या
फलटण (जि.सातारा) : सस्तेवाडी (ता. फलटण) येथील लोंढेवस्ती परिसरात एका ४० वर्षीय व्यक्तीची सशाच्या शिकारीच्या बहाण्याने बोलावून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गणेश बाळू मदने, असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी अवघ्या चार तासांत तपासाची चक्रे फिरवून दोन संशयित आरोपींना अटक केली.
ही घटना सोमवारी (दि. ५) रात्री ११ ते १:४० वाजेच्या सुमारास घडली. रोहन कैलास पवार (वय २०, रा. सोमवार पेठ, फलटण) व गणेश शंकर जाधव (२२, रा. सोमवार पेठ, फलटण, मूळ रा. कलिना, मुंबई), अशी अटक केलेल्यांची नावे असून, त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.
सस्तेवाडी-फलटण रस्त्यावर गणेश मदने रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाकडून पोलिसांना मिळाली होती. सुरुवातीला हा रस्ते अपघात असावा, असे भासवण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांना काही संशयास्पद बाबी आढळल्या. मदने यांची दुचाकी स्टँडवर व्यवस्थित उभी होती. दुचाकीच्या स्वीचला चावी तशीच होती. अपघाताच्या खुणा नसतानाही मृतदेहाची अवस्था संशयास्पद होती. पोलिसांनी ही विसंगती ओळखून तत्काळ नातेवाइकांकडे चौकशी केली.
काही वेळापूर्वी शेतात ससे पकडण्यासाठी आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींशी गणेश मदने यांचे भांडण झाल्याची माहिती समोर आली आणि तपासाची दिशा बदलली. निर्जनस्थळी आणि मध्यरात्री ही घटना घडल्याने पुराव्यांचा अभाव होता. मात्र, पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत आरोपींचा माग काढला. संशयित आरोपी परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांना शिताफीने ताब्यात घेऊन अटक केली.