बेपत्ता विवाहितेचा मृतदेह नदीत आढळला

By Admin | Updated: November 1, 2015 23:50 IST2015-11-01T23:50:21+5:302015-11-01T23:50:21+5:30

रेठरे बुद्रुकमधील घटना : नातेवाइकांचा रुद्रावतार; रुग्णालयात तणाव

The body of the missing marriage found in the river | बेपत्ता विवाहितेचा मृतदेह नदीत आढळला

बेपत्ता विवाहितेचा मृतदेह नदीत आढळला

कऱ्हाड : रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड) येथून बेपत्ता झालेल्या विवाहितेचा मृतदेह रविवारी दुपारी कृष्णा नदीपात्रात आढळून आला. दरम्यान, कऱ्हाडच्या उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह आणल्यानंतर माहेरच्या नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत सासरच्या मंडळींवर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. जास्मिन नौशाद मुल्ला (वय २८) असे मृत विवाहितेचे नाव आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, शिरवडे येथील जास्मिनचा विवाह सात वर्षांपूर्वी रेठरे बुद्रुकमधील नौशाद मुल्लाशी झाला होता. विवाहानंतर सासरच्यांनी जास्मिनला शारीरिक व मानसिक त्रास दिला. अशातच दोन दिवसांपूर्वी सकाळी जास्मिन घरातून बेपत्ता झाली. सासरच्यांसह माहेरच्या नातेवाइकांनी तिचा शोध घेतला. मात्र, ती आढळून आली नाही. कऱ्हाड तालुका पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती.
रविवारी जास्मिनचा मृतदेह कृष्णा नदीपात्रात आढळून आला. ताहेर चाँद संदे यांनी तालुका पोलिसांत खबर दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रूग्णालयात पाठविला. मात्र, सासरच्यांवर कारवाईची मागणी करीत माहेरच्या नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे तणावाचे वातावरण होते. अखेर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू केल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला. (प्रतिनिधी)

Web Title: The body of the missing marriage found in the river