लहान मुलांमधील भांडणे मिटवताना वाद, साताऱ्यात तरुणाच्या खुनाचा प्रयत्न; आठजणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 15:53 IST2025-10-10T15:53:08+5:302025-10-10T15:53:28+5:30
संशयितांची धरपकड

लहान मुलांमधील भांडणे मिटवताना वाद, साताऱ्यात तरुणाच्या खुनाचा प्रयत्न; आठजणांवर गुन्हा दाखल
सातारा: पेठेतील लहान मुलांमधील झालेले भांडण मिटविण्यासाठी एकत्र आलेल्या तरुणांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन एका तरुणाच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना दि. ८ रोजी दुपारी अडीच वाजता साताऱ्यातील यादोगोपाळ पेठेत घडली. याप्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये आर्यन रमेश कांबळे, आर्यन कांबळे, सूरज उंबरकर, भूषण बाबर, शौर्य परदेशी यांच्यासह अन्य तीन अनोळखी तरुणांचा (सर्व नागर रा. सैदापूर, ता. सातारा) समावेश आहे.
या प्रकरणाची फिर्याद नील हेमंत दीक्षित (वय २०, रा. मंगळवार पेठ, सातारा) यांनी दिली आहे. त्यांनी फिर्यादीत म्हटले आहेकी, यादोगोपाळ पेठेतील लहान मुलांमध्ये भांडण झाले होते. भांडण मिटवण्याच्या उद्देशाने संशयित आले. त्यांनी त्यांच्या मित्र कनिष्क सचिन जांगळेला (२४, रा. यादोगोपाळ पेठ, सातारा) ‘तू आमच्या लहान मुलांना मारहाण का केली?’ असे विचारले.
कनिष्कने ‘मी त्या मुलांना मारले नाही,’ असे सांगितले, मात्र त्याला जीवे मारण्याच्या हेतुने लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. यात कनिष्कच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास महिला सहायक पोलिस निरीक्षक बाबर करत आहेत.
संशयितांची धरपकड
या वादामुळे यादोगोपाळ पेठेत तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून कसून चौकशी सुरू आहे.