Satara Crime: अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तरुणाला वीस वर्षे शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 17:04 IST2026-01-07T17:02:50+5:302026-01-07T17:04:18+5:30
१९ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावास

Satara Crime: अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तरुणाला वीस वर्षे शिक्षा
शिरवळ : एका पंधरा वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याप्रकरणी किरण राजाराम वसेकर (वय २०) याला वाई येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एन. मेहरे यांनी दोषी धरत २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच १९ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावास, असाही न्यायालयाने आदेश दिला.
या खटल्याची पार्श्वभूमी अशी, संबंधित १५ वर्षीय मुलीबरोबर किरण वसेकर याने ओळख निर्माण केली. त्यानंतर विविध ठिकाणी तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. तिला फूस लावून धाराशिव येथे नेऊन तेथेही त्याने तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार २८ जानेवारी २०२१ ते २ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत घडला. मुलीच्या मावशीने शिरवळ पोलिस ठाण्यात किरण वसेकर याच्याविरुद्ध अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
यानंतर पोलिसांनी वसेकर याला अटक केली. फलटणचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सुनावणीदरम्यान एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षीदार ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी किरण वसेकर याला वीस वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारी वकील महेश यू. शिंदे यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले.
पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक नाना धायगुडे, अंमलदार सचिन भोसले, सचिन वीर, अंमलदार सुधाकर सपकाळ, न्यायालयीन प्राॅसिक्युशन स्काॅडचे सहायक पोलिस उपनिरीक्षक शिवाजीराव पांब्रे, अविनाश डेरे, अंमलदार कीर्तीकुमार कदम, भुजंगराव काळे, हेमा कदम, प्रीतम नाळे यांनी सरकार पक्षाला सहकार्य केले.