Satara: सोशल मीडियावर ओळख झाली, तरुणाने पुण्याच्या मैत्रिणीला कास पठार फिरायला बोलावले; अन्..
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 17:57 IST2025-12-25T17:52:11+5:302025-12-25T17:57:10+5:30
युवतीने फोन टाळल्यानंतरही संशयिताने वारंवार इन्स्टावर फोन कॉल्स व मेसेज केले

Satara: सोशल मीडियावर ओळख झाली, तरुणाने पुण्याच्या मैत्रिणीला कास पठार फिरायला बोलावले; अन्..
सातारा : सोशल मीडियावर ओळख झाल्यानंतर पुण्याच्या मैत्रिणीला साताऱ्यात बोलावून तिचा विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात एका तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला.
अलीआब्बास बागवान (रा. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नावे आहे. पीडित युवती पुणे जिल्ह्यातील रहिवासी असून, ती उच्चशिक्षित आहे. संबंधित युवतीला संशयित तरुणाने मे २०२५ मध्ये सोशल मीडियावर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. युवतीने अनोळखी आयडी दिसल्याने दुर्लक्ष केले. मात्र, त्यानंतर संशयिताने तिच्या इन्स्टावरून फोन नंबर घेऊन युवतीला फोन केला. युवतीने फोन टाळल्यानंतरही संशयिताने वारंवार इन्स्टावर फोन कॉल्स व मेसेज केले. ‘तुझ्याशी मैत्री करायची आहे,’ असा मेसेज तो करत होता. यामुळे युवतीने मैत्री स्वीकारली.
यानंतर संशयिताने कास पठार फिरायला युवतीला बोलावले. मैत्रीच्या विश्वासातून युवती २ सप्टेंबर रोजी साताऱ्यात आली. मात्र, संशयित युवकाने युवतीला एमआयडीसी, सातारा येथे नेले. ‘तू मला आवडते. माझ्याशी लग्न कर,’ असे म्हणत युवतीच्या हाताला धरून गैरप्रकार केला. यामुळे युवतीच्या मनास लज्जा उत्पन्न झाली. युवती या प्रकारानंतर पुण्याला गेली. परंतु, संशयिताने पुन्हा तिला मेसेज, फोन करत त्रास दिला. यामुळे पीडित युवतीने दि. २३ रोजी सातारा शहर पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दिली.