Satara: नात्यातील युवतीला फूस लावून पळवून नेले, बदनामी होईल म्हणून खून करून कोयना धरणालगत पुरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 18:38 IST2025-10-03T18:36:23+5:302025-10-03T18:38:51+5:30
नात्याने तो तिचा काका लागत असल्याने बदनामीची भीती

संग्रहित छाया
कोयनानगर : पाटण तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी उघडकीस आली आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये पीडित युवतीला आरोपीने फूस लावून पळवून नेले होते. मात्र, नात्यातील युवती असल्याने आपली बदनामी होईल, म्हणून त्याने युवतीचा खून करून तिचा मृतदेह पुरल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
तपासादरम्यान आरोपीने पीडितेशी प्रेमसंबंध असल्याचे मान्य केले. नात्याने तो तिचा काका लागत असल्याने बदनामीच्या भीतीने आरोपीने दि. ३ जानेवारी २०२५ रोजी कोयना धरणालगत युवतीचा गळा दाबून खून करून मृतदेह खड्ड्यात पुरला. ठाणेनगर पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडून कोयना नगर पोलिसांच्या ताब्यात दिले. पंचासमक्ष व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मृतदेह उत्खनन करून नातेवाइकांकडे सोपविण्यात आला.
कोयनानगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक एस. के. ओलेकर, पोलिस उपनिरीक्षक शिंगाडे, हवालदार एस. आर. ओव्हाळ, अजित शिंदे, संतोष पाटणकर, संतोष गायकवाड, साबीर मुल्ला, मंगेश महाडिक, सनी आवटे, धीरज महाडिक आदींनी ही कामगिरी केली. पोलिस पुढील तपास करीत आहेत.