Satara-ZP Election: दोन्ही राष्ट्रवादीसोबत जाण्यासाठी शिंदेसेनेची चाचपणी, काँग्रेस रणांगणात पण..
By नितीन काळेल | Updated: January 21, 2026 19:30 IST2026-01-21T19:28:29+5:302026-01-21T19:30:19+5:30
भाजपची स्वतंत्र यादी येणार, काँग्रेस रणांगणात पण, किती ठिकाणी ?

Satara-ZP Election: दोन्ही राष्ट्रवादीसोबत जाण्यासाठी शिंदेसेनेची चाचपणी, काँग्रेस रणांगणात पण..
नितीन काळेल
सातारा : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी महायुतीत फाटाफूट झाली असून, भाजपची स्वतंत्र रणनीती आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवारांची यादी लवकरच जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादीही एकत्र येत असून, याअंतर्गत उमेदवारांना तुतारी आणि घड्याळ चिन्हांचा चाॅइस असणार असल्याची माहिती मिळत आहे. तर, दुसरीकडे शिंदेसेनाही तयारीत असून, राष्ट्रवादीबरोबरही काही बाबतीत चर्चा सुरू आहे.
जिल्हा परिषदेची निवडणूक तब्बल नऊ वर्षांनी होत आहे. या निवडणुकीत महायुतीत ताळमेळ बसताना दिसत नाही. घटक पक्षातील शिंदेसेनेने एक हात पुढे केला असला, तरी भाजपकडून तेवढे सहकार्य झाले नाही. त्यातच भाजपचे नेतेच आक्रमक झाल्याने महायुतीत फाटाफूट झाल्याचे स्पष्ट आहे. त्याचबरोबर भाजपने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण केल्यात. त्यामुळे मंगळवारी रात्री उशिरा किंवा बुधवारी सकाळी उमेदवारांची यादी बाहेर पडणार आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीनेही गळ्यातगळे घालण्यास सुरुवात केली आहे. दोघेही निवडणुकीत एकत्र येणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
सध्या जागा वाटपांची बोलणी सुरू आहे. पण, या निवडणुकीत महत्त्वाचे म्हणजे दोन्ही पक्षांतील उमेदवारांना निवडणूक चिन्ह वापरण्याचा चाॅइस असणार आहे. म्हणजे दोन्ही पक्षांतील उमेदवार हे घड्याळ आणि तुतारी हे दोन्हीही चिन्ह चाॅइसनुसार वापरू शकतात. त्यामुळे राष्ट्रवादीत ताळमेळ बसल्याचेच स्पष्ट झाले आहे.
शिंदेसेना पाटण, कोरेगाव आणि फलटण विधानसभा मतदारसंघात ताकद लावून उभी राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर शिंदेसेनेची बोलणी झाली असली, तरी त्यातून पुढे अजून काहीच आले नाही. यामध्ये महायुतीतील राष्ट्रवादीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. शिंदेसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास भाजपला अनेक ठिकाणी शह बसू शकतो. त्यामुळे शिंदेसेना आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष लागलेले आहे. बुधवार हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे बुधवारी दुपारपर्यंत जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे चित्र पूर्णपणे स्पष्ट झालेले असेल हे नक्की.
काँग्रेस रणांगणात पण, किती ठिकाणी ?
जिल्ह्यात या निवडणुकीच्या माध्यमातून महायुतीअंतर्गत फाटाफूट झाल्यातच जमा आहे. तर, महाविकास आघाडीही एकसंघ असल्याचे दिसत नाही. कारण, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यात. त्यामुळे राष्ट्रीय काँग्रेसपुढे अडचण आहे. काँग्रेसला स्वतंत्र लढावे लागणार आहे. यासाठी पक्षाकडून तालुकाध्यक्षांना स्थानिक स्तरावर निर्णय घ्यावेत, असे सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे काँग्रेस जिल्ह्यात किती ठिकाणी लढणार हे अजून कोडेच आहे. तर, उद्धवसेनेची ताकदही तोकडीच आहे. यामुळे महाविकास आघाडीअंतर्गत काँग्रेस आणि उद्धवसेनेची उडी कुठपर्यंत पडणार हे पाहावे लागणार आहे.