बांधकाम व्यावसायिकाकडे मागितली २० लाखांची खंडणी, साताऱ्यात एकावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 15:43 IST2025-10-08T15:42:50+5:302025-10-08T15:43:10+5:30
पोलिस स्टेशन माझे काही करू शकत नाही, म्हणत दिली जीवे मारण्याची धमकी

बांधकाम व्यावसायिकाकडे मागितली २० लाखांची खंडणी, साताऱ्यात एकावर गुन्हा दाखल
सातारा : जागेच्या व्यवहारासाठी ४० लाख दिले असतानाही बांधकाम व्यावसायिकाकडे आणखी २० लाख रुपयांची मागणी केल्याच्या आरोपावरून सातारा शहर पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे.
शंकर दत्तात्रय जाधव (रा. कोडोली, सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. वरद बिल्डर ॲण्ड प्रमोटतर्फे (सातारा) फिर्याद देण्यात आली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, संशयिताने फोनवरून व्यवहारासाठी तुम्ही आतापर्यंत ४० लाख रुपये दिले आहेत. त्या बदल्यात मला अजून २० लाख रुपये जादा वाढवून दिले पाहिजेत.
नाहीतर मी आपला करारनाम्याप्रमाणे माझ्या पत्नीला सही करून देणार नाही. असे म्हणून शिवीगाळ करून तुला पोलिस स्टेशनला काय तक्रार करायची ते कर, पोलिस स्टेशन माझे काही करू शकत नाही, असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. हवालदार गुरव हे अधिक तपास करीत आहेत.