सातारा लोकसभा मतदार संघात दोन्ही राष्ट्रवादींमध्येच लढत शक्य; भाजपची ताकद वाढली तरी..

By दीपक शिंदे | Published: March 7, 2024 04:12 PM2024-03-07T16:12:58+5:302024-03-07T16:13:29+5:30

ऐनवेळी काय राजकारण घडते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार

a fight is possible between both the Nationalist Congress Party In Satara Lok Sabha Constituency, Even if BJP's strength increases, allies claim | सातारा लोकसभा मतदार संघात दोन्ही राष्ट्रवादींमध्येच लढत शक्य; भाजपची ताकद वाढली तरी..

सातारा लोकसभा मतदार संघात दोन्ही राष्ट्रवादींमध्येच लढत शक्य; भाजपची ताकद वाढली तरी..

दीपक शिंदे

सातारा : महायुतीतील इच्छुकांची वाढलेली संख्या आणि महाआघाडीतील फूट यामुळे कोणत्या पक्षाने सातारा लोकसभा मतदारसंघ घ्यायचा अन् कोणी सोडायचा याचाच गोंधळ सुरू आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी खासदारकीसाठी शड्डू ठोकलेला असला तरी मैदानात उतरताना त्यांना भाजपऐवजी मित्रपक्षाचा आधार तर घ्यावा लागणार नाही ना अशी स्थिती आहे. कारण महायुतीतील राष्ट्रवादी पक्षाने साताऱ्याची मागणी केली आहे. तर महाआघाडीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे विद्यमान खासदारकी असल्याने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होण्याची शक्यता अधिक आहे. 

 सातारा लोकसभा मतदारसंघ हा पूर्वी काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेला मतदारसंघ. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पक्षाची जिल्ह्यातील ताकदही दुभंगली. राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट झाल्याने आपली ताकद आजमाविण्याचा ते नक्कीच प्रयत्न करणार. यशवंतराव चव्हाण यांचे मानसपुत्र म्हणून संपूर्ण जिल्हा शरद पवारांसोबत गेली अनेक वर्षे राहिला. याच जिल्ह्याने त्यांना नव्या उभारीची ताकद दिली.

पावसातील सभेने राज्याचे राजकारण बदलले. त्यामुळे याच जिल्ह्यात त्यांना पराभूत करून शरद पवार यांना शह देण्याचा प्रयत्न भाजपकडून होणार आहे. त्यासाठी भाजपने जिल्ह्यात आपली ताकद वाढलेली असली तरी हा मतदारसंघ अजित पवार गटाला सोडावा, अशी रणनीती आखण्याचे काम सुरू आहे. आपल्याच पुतण्याकडून बालेकिल्ल्यातच मात देण्याचा भाजपचा डाव दिसतो आहे. 

राज्यसभेपेक्षा लोकसभेत आपल्याला संधी मिळावी, अशी खासदार उदयनराजे भोसले यांची तीव्र इच्छा आहे. पण, भाजपने याबाबत अजून कोणताच निर्णय घेतलेला नाही. युतीच्या पातळीवर चर्चा सुरू असून चर्चेनंतरच निर्णय होईल, असे खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच सांगितले आहे.  अजित पवार यांच्याकडे लोकसभेसाठी नितीन पाटील यांच्यासारखा सर्वमान्य उमेदवार आहे. मात्र, ऐनवेळी काय राजकारण घडते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील, त्यांचे चिरंजीव सारंग पाटील,  सुनील माने आणि सत्यजितसिंह पाटणकर यांनीही इच्छा व्यक्त केली आहे. पण, महाआघाडीची ताकद कशी लागणार यावर त्यांच्या उमेदवारांची जुळणी आणि विजयाचा मार्ग निश्चित होणार आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय कधी भाजप, कधी शिवसेना (शिंदे गट), तर कधी काँग्रेसही सातारा मतदारसंघ आपल्याला मिळावा, अशी जाता-जाता मागणी करताना पाहायला मिळतात. पण, खरा दावा हा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच महायुती आणि महाआघाडीतील पक्षांची तिथे फार काही डाळ शिजणार नाही, असे दिसते. 

  • ५०,००० सर्वाधिक मताधिक्य श्रीनिवास पाटील यांना कऱ्हाडमधून. 
  • विधानसभेच्या कऱ्हाड उत्तर मतदार संघातून सर्वाधिक तर कविधानसभा मतदारसंघातून सर्वात कमी मताधिक्य मिळाले. 


२०१९ च्या निवडणुकीतील महत्त्वाचे फॅक्टर 

  • खासदार उदयनराजे भोसले यांनी सहा महिन्यांत राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला. 
  • भाजपमध्ये प्रवेश केल्याचा त्यांना फटका बसला आणि पराभव स्वीकारावा लागला. 
  • राष्ट्रवादीची एकसंध ताकद खासदार श्रीनिवास पाटील यांना उपयोगी पडली. 
  • पक्षाच्या आमदारांनी केलेली मदत महत्त्वाची ठरली. 


असा झाला बदल २०१९

  • ०७%  पोटनिवडणुकीत मतदारसंख्या वाढली 
  • सर्वसाधारण निवडणुकीत ११ लाख १७ हजार ७५७ मतदारांनी केले मतदान
  • पोटनिवडणुकीत १२ लाख ४९ हजार १५१ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क 


 ८७७१७ गत पोटनिवडणुकीत खासदार श्रीनिवास पाटील यांना मिळालेले मताधिक्य

मतदारसंघ      पुरुष        स्त्री             एकूण 
वाई                  १६९५९९  १६७७३०    ३३७३३४ 
कोरेगाव           १५८०३५   १५१७९०    ३०९८२७ 
कऱ्हाड उत्तर    १४९७६५  १४३३८२    २९३१५४ 
कऱ्हाड दक्षिण  १५२५८७  १४५६९१    २९८३०३ 
पाटण               १५१४८०    १४६०९१    २९७५७१ 
सातारा             १६७१०१    १६४८४८    ३३१९७७ 
एकूण               ९४८५६७   ९१९५३२    १८६८१६६

आमदार किती कुणाचे 

काँग्रेस - ०१
राष्ट्रवादी अजित पवार गट - ०१
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार - ०२ 
शिवसेना शिंदे गट- ०२
भाजप  - ०१

Web Title: a fight is possible between both the Nationalist Congress Party In Satara Lok Sabha Constituency, Even if BJP's strength increases, allies claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.