वडिलांना गांजा ओढायला लागतो म्हणून केली गांज्याची लागवड, सातारा तालुका पोलिसांकडून शेतकरी ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 13:40 IST2026-01-09T13:40:28+5:302026-01-09T13:40:46+5:30
परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा लागवड केल्याने त्याचा हेतू भलताच असावा, असे पोलिसांचे म्हणणे

वडिलांना गांजा ओढायला लागतो म्हणून केली गांज्याची लागवड, सातारा तालुका पोलिसांकडून शेतकरी ताब्यात
सातारा : गांजा वडिलांना ओढायला लागतो म्हणून एका शेतकऱ्याने चक्क गव्हाच्या शेतात गांज्याची लागवड केल्याचे सातारा तालुका पोलिसांनी उघडकीस आणले असून, संबंधिताला पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई पाली, ता. सातारा येथे गुरुवारी दुपारी करण्यात आली.
नामदेव लक्ष्मण माने (वय ४२, रा. पाली, पो. रोहट, ता. सातारा) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. कास तलावाच्या पलीकडील पाली या गावात एका शेतकऱ्याने गव्हाच्या शेतात गांजाची लागवड केल्याची माहिती पोलिस निरीक्षक नीलेश तांबे यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी स्वत: आपल्या टीमसह गुरुवारी दुपारी तेथे छापा टाकला. यावेळी पोलिसांनी नामदेव माने या शेतकऱ्याला ताब्यात घेतले.
त्याने दीड ते दोन महिन्यांपूर्वी शेतात गहू पेरला होता. त्याच कालावधीत गव्हाच्या पिकात ठिकठिकाणी लहान-मोठी गांजाची रोपे लावली होती. शेतात आंतरपीक म्हणून गांजाची मोठ्या प्रमाणात लागवड झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या गांजाची किंमत सुमारे १२ लाख असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी नामदेव माने याच्याकडे कसून चाैकशी केली असता त्याने वडिलांना गांजा ओढायला लागतो म्हणून लागवड केल्याचे सांगितले. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा लागवड केल्याने त्याचा हेतू भलताच असावा, असे पोलिसांचे म्हणणे आहे. सातारा तालुका पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.