Satara: बिअरच्या बाटल्या भरलेल्या मालट्रकला कंटेनरची पाठीमागून धडक; चालक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 14:27 IST2025-08-13T14:26:32+5:302025-08-13T14:27:51+5:30
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर नांदलापूर हद्दीत अपघात, मालासह वाहनांचे नुकसान

Satara: बिअरच्या बाटल्या भरलेल्या मालट्रकला कंटेनरची पाठीमागून धडक; चालक जखमी
मलकापूर : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर नांदलापूर हद्दीत बिअरच्या बाटल्या भरून उभ्या असलेल्या मालट्रकला कंटेनरची पाठीमागून धडक झाली. या अपघातात कंटेनर चालक जखमी झाला तर मालासह वाहनांचे मोठे नुकसान आहे. हा अपघात मंगळवारी पहाटे पावणेपाच वाजण्याच्या सुमारास झाला. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
अपघातस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मालट्रक हा भिवंडीहून बियरचे बॉक्स घेऊन कोल्हापूरच्या दिशेने निघाला होता. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर नांदलापूर हद्दीत आला असता चालकाने ट्रक महामार्गाकडेला थांबवला. त्याच वेळी पाठीमागून कोल्हापूरच्या दिशेने निघालेल्या भरधाव कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक झाली. या धडकेत ट्रक महामार्गावरच आडवा झाला. ट्रकमधील बियरच्या बाटल्या भरलेली खोकी महामार्गावर पडल्याने फुटून काचांचा खच पसरला होता.
या अपघातात कंटेनर चालक जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच क्रेनचालक सुनील कदम, राहुल कदम हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. रुग्णवाहिकेतून जखमीला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात पाठवून दिले. अपघाताची माहिती कराड शहर पोलीस ठाण्यातील अपघात विभागाला दिली. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.
बाटल्यांची पळवापळवी
नांदलापूर येथे सोमवारी सकाळी बियरचे बॉक्स घेऊन निघालेल्या ट्रकचा अपघात झाला. अपघातात ट्रकमधील बियरच्या बाटल्या भरलेले बॉक्स महामार्गावरच पडले होते. त्यामधील काही बाटल्या फुटल्या तर काही सुस्थितीत होत्या. परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी जाऊन बियरच्या बाटल्यांची पळवापळवी केली.
दुसऱ्या अपघातात वळण मार्गावर ट्रेलर घुसला
नांदलापूर गावच्या हद्दीत सोमवारी मध्यरात्रीनंतर दीड वाजण्याच्या सुमारास अन्य एक अपघात झाला होता. या अपघातात कोल्हापूरकडून पुण्याकडे निघालेल्या ट्रेलर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वळण मार्गावर तो सरळच घुसला. सुरक्षा कठड्याला धडक होऊन ट्रेलरचे नुकसान झाले आहे.