सातारा: शॉर्ट सर्किटने लागली आग, ओगलेवाडीत ४० एकर ऊस जळून खाक
By प्रमोद सुकरे | Updated: October 28, 2022 17:00 IST2022-10-28T16:26:31+5:302022-10-28T17:00:12+5:30
सुमारे ३ तास आगीचे तांडव सुरू होते. ऊस डोळयासमोर जळताना पाहून शेतकऱ्यांच्या जिवाची घालमेल झाली. तर अनेक शेतकऱ्यांना अश्रु अनावर झाले.

सातारा: शॉर्ट सर्किटने लागली आग, ओगलेवाडीत ४० एकर ऊस जळून खाक
कऱ्हाड: ओगलेवाडी (ता.कऱ्हाड) येथे शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत ४३ शेतकऱ्यांचा जवळपास ४० एकर ऊस जळून खाक झाला. काल, गुरूवारी दुपारच्या सुमारास डुबल मळा येथे ही आग लागली. सध्या महसुल विभागाच्यावतीने पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. तर प्रशासनाने जळीत ऊस तातडीने गळीतास न्यावेत तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, टेंभू रोड रेल्वे स्टेशन फाटयाच्या दक्षिण बाजूस डुबल मळा आहे. दुपारच्या सुमारास हणमंत जगताप यांच्या शेतातील विजेच्या खांबावर शॉर्टसर्किट झाल्याने ऊसाला आग लागली. वाऱ्याने ही आग वणवे मळा व गोवारेच्या हद्दीपर्यंत पसरली.
घटनेची माहिती मिळताच कराड नगरपरीषद अग्निशमन विभागाच्या दोन गाडया घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी उत्तरेकडील आग आटोक्यात आणली. मात्र शेतात मोठया प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने दक्षिण व पश्चिम बाजूकडील आग विझविण्यात अपयश आले. शेवटी ऊसाचे क्षेत्र संपल्यानंतर आपोआप आग विझली. सुमारे ३ तास आगीचे तांडव सुरू होते. वर्ष ते दीड वर्ष सांभाळलेला व वाढवेला ऊस डोळयासमोर जळताना पाहून शेतकऱ्यांच्या जिवाची घालमेल झाली. तर अनेक शेतकऱ्यांना अश्रु अनावर झाले.