सातारा जिल्ह्यात मोठी धरणे भरू लागली; नद्याही दुथडी भरून वाहू लागल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 19:42 IST2025-07-28T19:41:02+5:302025-07-28T19:42:35+5:30
सहा प्रकल्पात १२३ टीएमसी पाणी : कोयना, धोम, बलकवडी, तारळी, कण्हेर अन् उरमोडीत ८३ टक्के साठा

सातारा जिल्ह्यात मोठी धरणे भरू लागली; नद्याही दुथडी भरून वाहू लागल्या
सातारा : जिल्ह्यात मागील आठवड्यापासून सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे पश्चिम भागातील धरणे भरू लागली आहेत. त्यामुळे सोमवारी सकाळच्या सुमारास कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी या सहा मोठ्या प्रकल्पात १२३ टीएमसीवर पाणीसाठा झाला होता. ही धरणे ८३ टक्के भरली होती. तर धरणातून विसर्ग सुरू असल्याने नद्याही दुथडी भरून वाहू लागल्या आहेत.
जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यानंतर पावसाची उघडझाप सुरू झाली; पण मागील संपूर्ण आठवडा पावसाने गाजविला. पश्चिम भागात मुसळधार पाऊस पडत होता. कास, बामणोली, तापोळा, कोयना, नवजासह कांदाटी खोऱ्यातील पावसामुळे जनजीवनावर परिणाम झाला. हा पाऊस मोठ्या धरणक्षेत्रातही सुरू होता. यामुळे धरणांतही मोठ्या प्रमाणात साठा वाढला. परिणामी धरणांमधून विसर्ग वाढवावा लागला. सध्या पावसाचा जोर कमी झाला असला तरी प्रमुख मोठे सहा प्रकल्प ८३ टक्के भरलेले आहेत.
सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ४७, नवजा ४१ आणि महाबळेश्वरला ८७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे सकाळच्या सुमारास धरणात ३८ हजार क्युसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणातील पाणीसाठा ८५.४४ टीएमसी पाणीसाठा झाला होता. ८१.१८ धरण पाणीसाठ्याची टक्केवारी होती. तर धरणाचा पायथा वीजगृह २ हजार १०० आणि धरणाच्या सहा वक्रदरवाजातून २९ हजार ६४६ असा एकूण ३१ हजार ७४६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झालेली आहे.
महाबळेश्वरला ३३०२ मिलिमीटरची नोंद..
जिल्ह्यात जून ते सप्टेंबर महिन्यादरम्यान पाऊस पडतो. यंदा एक जूनपासून आतापर्यंत कोयनानगर येथे २ हजार ९३५ मिलिमीटर पाऊस झालेला आहे. तर नवजा येथे ३ हजार १८२ आणि महाबळेश्वरमध्ये ३ हजार ३०२ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. सातारा शहरातही पावसाची उघडझाप कायम आहे.
प्रमुख धरणातून ४८ हजार क्युसेक विसर्ग..
पश्चिम भागात पाऊस असल्याने कोयनासह प्रमुख धरणातून विसर्ग सुरूच आहे. सकाळच्या सुमारास धोम धरणातून ७ हजार १३१, बलकवडी ७४०, कण्हेर ४ हजार २९०, उरमोडी ५०० आणि तारळी धरणातून ३ हजार ५४९ क्युसेकने पाणी सोडले जात होते. त्यामुळे या सहा धरणातून एकूण ४७ हजार ९६२ क्युसेक पाणी विसर्ग होता. परिणामी वेण्णा, कोयना, उरमोडी तसेच कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झालेली आहे. अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. दरम्यान, सध्या काही भागात पाऊस कमी झाल्याने विसर्गात घट होणार आहे.