Satara: जादा परताव्याचे आमिष; अभियंत्याची १ कोटीची फसवणूक, एकाविरोधात सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 18:40 IST2024-12-30T18:39:48+5:302024-12-30T18:40:51+5:30
शिरवळ : खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी येथील विकर्ष स्टॅम्पिंग इंडिया प्रा.लि., या कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास बँकेपेक्षा जास्त परतावा देतो, असे ...

Satara: जादा परताव्याचे आमिष; अभियंत्याची १ कोटीची फसवणूक, एकाविरोधात सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
शिरवळ : खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी येथील विकर्ष स्टॅम्पिंग इंडिया प्रा.लि., या कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास बँकेपेक्षा जास्त परतावा देतो, असे आमिष दाखवत अभियंत्याची एक कोटी १० लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तसेच शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकाविरुद्ध पुणे येथील सिंहगड रोड पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. कंपनीचे लक्ष्मीकांत नथुराम त्रिवेदी (रा. फ्लॅट नंबर ३०१, भारत श्री एरंडवणे, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यवस्थापकीय संचालकांचे नाव आहे.
आप्पासो दत्तात्रय शेडगे (वय ५६) हे सध्या पुणे येथील मोहिते टाऊनशिप, आनंदनगर, सिंहगड रोड याठिकाणी वास्तव्यास आहेत. ते मूळ हातनूर, ता. तासगाव, जि. सांगली येथील रहिवासी आहेत. एका मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये डिझायनर कन्सल्टंट म्हणून ते कार्यरत होते. एका मित्राने लक्ष्मीकांत त्रिवेदी यांची ओळख करून दिल्यानंतर आप्पासो शेडगे व लक्ष्मीकांत त्रिवेदी यांच्या गाठीभेटी होत राहिल्या. त्रिवेदी यांनी आप्पासो शेडगे यांना आपल्या धनगरवाडी येथील विकर्ष स्टॅम्पिंग इंडिया प्रा. लि., या कंपनीमध्ये पैसे गुंतवणूक करा, बँकेपेक्षा जास्त प्रमाणात नफा मिळवून देतो तसेच गुंतवणुकीच्या रकमेवर तीस टक्के परतावा मिळवून देतो असे सांगितले.
त्रिवेदी याच्या आमिषाला बळी पडत आप्पासो शेडगे यांनी चेकद्वारे ८१ लाख रुपये व रोख स्वरुपात २९ लाख ५० हजार रुपये लक्ष्मीकांत त्रिवेदी याला सुपूर्द केले. यामध्ये त्रिवेदी व शेडगे यांच्यामध्ये लेखी करारही झाला. दरम्यान, गुंतवलेली रक्कम व त्यावरील कोणताही परतावा न दिल्याने शेडगे यांनी त्रिवेदी यांना वारंवार विचारणा केली. याबाबत त्रिवेदी टाळाटाळ करीत होते.
तसेच आप्पासो शेडगे यांना त्रिवेदी यांना गुंतवणुकीपोटी दिलेले चेक वटलेच नाहीत. त्यामुळे शेडगे यांनी त्रिवेदीकडे गुंतवणूक केलेली रक्कम परत मागितली. त्यावेळी त्रिवेदी याने शेडगे यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. आपली फसवणूक झाल्याचे कळताच शेडगे यांनी त्रिवेदी यांच्याविरुद्ध तक्रार केली. याबाबत सिंहगड रोड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला.