Sangli Accident News: अपघातात तरूण ठार, संतप्त जमावाने ट्रक पेटविला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 18:50 IST2026-02-21T18:49:46+5:302026-02-21T18:50:30+5:30
ट्रकचालक पसार

Sangli Accident News: अपघातात तरूण ठार, संतप्त जमावाने ट्रक पेटविला
सांगली : सांगली ते आष्टा रस्त्यावर तुंग येथे राया हायटेक नर्सरी समोर रिफ्लेक्टर नसलेल्या ट्रकवर दुचाकी आदळून दुचाकीस्वार शिवकुमार श्रीकांत पाटील (वय २९, रा. ढवळी, ता. वाळवा) हा जागीच ठार झाला. तर मागे बसलेला यशवंत वसंत पाटील (रा. फार्णेवाडी) हा जखमी झाला. गुरूवारी रात्री ९.३० च्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला. त्यामध्ये ट्रकची केबिन पूर्णपणे जळून खाक झाली.
सांगली ग्रामीण पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ढवळी येथील शिवकुमार पाटील व त्याचा मित्र यशवंत पाटील हो दोघेजण गुरूवारी रात्री दुचाकी (एमएच ०९ एजे ७४३६) वरून गावाकडे जात होते. तुंग येथील राया हायटेक नर्सरी समोर रात्री साडेनऊच्या सुमारास ट्रक (आरजे ०९ जीडी ३९४३) आष्ट्याकडे तोंड करून थांबला होता. ट्रक रस्त्याकडेला उभा केल्यानंतर दिशादर्शक फलक आणि रिफ्लेक्टर ही लावलेला नव्हता. तसेच पार्किंग लाईट न लावल्यामुळे तो धोकादायक स्थितीत उभा होता.
त्याचवेळी शिवकुमार याला अंधारात थांबलेला ट्रक दिसला नाही. दुचाकी ट्रकवर आदळल्यानंतर शिवकुमार याच्या डोक्याला, कपाळाला मार लागून गंभीर जखमी होऊन निपचिप पडला. तर मागे बसलेला यशवंत पाटील जखमी झाला. डॉक्टरांनी घटनास्थळी तपासल्यानंतर शिवकुमार हा मृत असल्याचे समजले. यशवंतला आष्टा येथे उपचारास नेले.
सांगली ग्रामीण पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा गर्दी जमली होती. पोलिसांनी गर्दी हटवून पंचनामा केला. शिवकुमारचा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवला. अपघाताची माहिती मिळताच मृत शिवकुमारच्या नातेवाइकांनी धाव घेतली. त्याचे चुलते सुभाष संपतराव पाटील (वय ६४, रा. ढवळी) यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दरम्यान अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमली होती. ट्रक चालकाने रिफ्लेक्टर तसेच पार्किंग लाईट न लावल्यामुळे अपघात झाल्याचे दिसून आले. त्यामुळे संतप्त जमावाने ट्रकची तोडफोड करत केबिन पेटवून दिली. त्यामुळे काही वेळातच केबिन जळून खाक झाली.
ट्रकचालक पसार
तुंग येथे लावलेला राजस्थान पासिंगच्या ट्रकवर दुचाकी आदळून अपघात झाल्यानंतर चालकाने तेथून पलायन केल्याचे दिसून आले. अनोळखी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्याचा शोध सुरू आहे. पोलिस उपनिरीक्षक इस्माईल तांबोळी तपास करत आहेत.