योगासन क्रीडा स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:33 IST2021-09-16T04:33:08+5:302021-09-16T04:33:08+5:30

सांगली : ‘खेलो इंडिया’अंतर्गत निवड प्रक्रियेसाठी योगासन स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातील योगासन खेळाडूंनी या स्पर्धेत ...

Yogasana sports competition program announced | योगासन क्रीडा स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर

योगासन क्रीडा स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर

सांगली : ‘खेलो इंडिया’अंतर्गत निवड प्रक्रियेसाठी योगासन स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातील योगासन खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनचे सचिव डॉ. संजय मालपाणी यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील संघाची निवड केली जाणार आहे. मुला-मुलींच्या स्वतंत्र तीन वयोगटात होणाऱ्या या स्पर्धेतून प्रत्येक गटातील चौदा खेळाडूंची राज्य व राष्ट्रीय पातळीवरील संघात निवड केली जाणार आहे. ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंकडून योगासनांच्या विविध पाच स्पर्धा प्रकारांचे व्हिडिओ मागविण्यात आले आहेत. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या योगासन खेळाडूंनी जिल्ह्यातील स्पर्धा समन्वयकांशी संपर्क साधावा.

असोसिएशनने राज्यातील योगासन स्पर्धांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या स्पर्धत ९ ते १४, १४ ते १८ व १८ वर्षांपुढील मुला-मुलींचे स्वतंत्र तीन गट असतील. प्रत्येक गटात सहभागी स्पर्धकाचे वय ३१ डिसेंबर २०२१ पर्यंतचे गृहीत धरले जाणार आहे.

पारंपरिक योगासन (वैयक्तिक), कलात्मक योगासन (वैयक्तिक व दुहेरी), तालात्मक योगासन (दुहेरी) व सांघिक कलात्मक (पाच खेळाडू) अशा पाच प्रकारांमध्ये होणाऱ्या या स्पर्धेतून प्रत्येक गटातील प्रत्येकी चौदा खेळाडूंची जिल्हास्तरावरून राज्य पातळीवर व राज्य पातळीवरून राष्ट्रीय पातळीवर निवड करण्यात येणार आहे. १८ सप्टेंबरपर्यंत या स्पर्धेसाठी नावनोंदणी करता येणार असून, अधिकाधिक योगासन खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष बापू पडाळकर व स्पर्धा संचालक सतीश मोहगावकर यांनी केले आहे.

Web Title: Yogasana sports competition program announced