आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 06:56 IST2026-04-20T06:55:29+5:302026-04-20T06:56:12+5:30

नव्याण्णव पूर्णांक नव्याण्णव टक्के म्हणजे १०० टक्के नव्हे, या सूत्रावर जगभरातील विमान उद्योग चालतो. पण विशेषतः गेल्या दीड वर्षात भारतीय विमान उद्योगाला हे सूत्र बहुधा मान्य नसावे. एअर इंडियाच्या ‘अहमदाबाद ते लंडन’ या विमान दुर्घटनेनंतर किंवा अजित पवार यांच्या विमान अपघातानंतरही अशा काही घटना घडल्या की विमान सुरक्षेचा आणि पर्यायाने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Aviation Safety at Stake: Systemic Failures and Rising Incidents Under the Radar | आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!

आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!

नव्याण्णव पूर्णांक नव्याण्णव टक्के म्हणजे १०० टक्के नव्हे, या सूत्रावर जगभरातील विमान उद्योग चालतो. पण विशेषतः गेल्या दीड वर्षात भारतीय विमान उद्योगाला हे सूत्र बहुधा मान्य नसावे. एअर इंडियाच्या ‘अहमदाबाद ते लंडन’ या विमान दुर्घटनेनंतर किंवा अजित पवार यांच्या विमान अपघातानंतरही अशा काही घटना घडल्या की विमान सुरक्षेचा आणि पर्यायाने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गुरुवारी दिल्लीत अकासा एअर आणि स्पाइसजेट विमानांमध्ये झटापट झाली. लेहवरून आलेले स्पाइसजेटचे विमान दिल्ली विमानतळावर टॅक्सी-वेकडे जात असतेवेळीच अकासा एअर कंपनीचे विमान हैदराबादसाठी धावपट्टीकडे जात होते. दोन्ही विमाने एकाचवेळी चालत होती आणि दोन्ही विमानांच्या पंखांची एकमेकांना टक्कर बसली. खुद्द विमानतळावरच ही घटना घडली.

विमानतळावर जिथे सुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळले जातात तिथे अशी टक्कर होणे हे अतिशय भीषण आहे. यामध्ये यंत्रणा आणि ती चालविणारी माणसे यांची निश्चित चूक आहे. आता या प्रकरणाची नागरी विमान वाहतूक महासंचालनालयातर्फे (डीजीसीए) चौकशी होईल. पण चौकशी अहवाल कधी येईल आणि त्यातून पुढे काय होईल हे अनंतकाळ गुलदस्त्यात राहणार आहे. कारण पूर्वानुभव तेच सांगतो. विमान वाहतुकीच्या सुरक्षेसंदर्भात देशात प्रामुख्याने दोन प्रमुख यंत्रणा कार्यरत आहेत. एक नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) आणि दुसरी एअरक्राफ्ट ॲक्सिडंट इन्व्हेस्टिगेशन ब्यूरो (एएआयबी). 

दैनंदिन घडामोडींसदर्भात डीजीसीए ही यंत्रणा कायमस्वरूपी सतर्क असते किंवा अलीकडच्या काळातील घटना पाहता डीजीसीएने सतर्क असणे अपेक्षित आहे, असे म्हणावे लागेल. विमानाला मोठा अपघात झाला तर एएआयबी त्याची सखोल तपासणी करते. मात्र, एएआयबीचा आजवरचा अनुभवदेखील फारसा चांगला नाही. वर्षानुवर्षे तपास सुरू राहतो आणि बहुतांश प्रकरणांमध्ये वैमानिक तसेच विमान वाहतूक प्रणालीवर (एटीसी) ठपका ठेवून तपासाची फाइल बंद केली जाते. हे दिसते तितके सोपे नाही. कारण, अशा पद्धतीच्या लहान-मोठ्या अपघातांचे खापर हे वैमानिक आणि विमान वाहतूक प्रणालीवरच फोडले जाते. त्याच्या खोलात तपास यंत्रणा जात नाहीत किंवा त्यांना जायची इच्छा नसते. ही इच्छा नसण्याचे कारण म्हणजे, विमान कंपन्यांना आपला ब्रँड हा अधिक महत्त्वाचा असतो. 

आपल्या ब्रँडला जपण्यासाठी कॉर्पोरेट कंपन्या जंगजंग पछाडतात आणि मग तपास यंत्रणांशी हातमिळवणी करून वैमानिक किंवा शेवटच्या घटकावर त्याचे खापर फोडून मोकळ्या होतात. आणखी एक गंभीर मुद्दा म्हणजे, विमानांची देखभाल. विमानाची स्थिती कशी आहे, त्यांची नियमित देखभाल होते का, यासंदर्भात डीजीसीएने नियमित तपासणी करणे अपेक्षित आहे. आजच्या घडीला देशामध्ये जवळपास ५५० विमाने आहेत. या विमानांच्या तपासणी व स्थितीचा अहवाल विमान कंपन्यांनी नियमितपणे डीजीसीएला देणे अपेक्षित आहे. विमान कंपन्या नियमाचा भाग म्हणून तो अहवाल देतातही. मात्र, विमान जर सुस्थितीत आहे तर त्याचा अपघात का होतो. 

लहान किंवा मोठा अपघात हा विमानाच्या बाबतीत गैरलागू मुद्दा आहे. कारण विमानप्रणाली इतकी संवेदनशील आहे की दोन विमानांचे पंख एकमेकांना घासले तरी त्यातून आग लागून जीवितहानी होण्याची शक्यता असते. एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाल्यानंतर डीजीसीएची यंत्रणा खडबडून जागी झाल्यासारखी दिसली आणि त्यांनी देशातील विमान कंपन्यांच्या अनेक विमानांचे लेखापरीक्षण सुरू केले. अनेक विमानांमध्ये तांत्रिक दोष असल्याचे आढळून आले.

विमान कंपन्या नियमित देखभाल करत आपली विमाने तंदुरुस्त असल्याचा अहवाल कागदोपत्री सादर करत असतील, तर या विमानांमध्ये तांत्रिक दोष कसा निर्माण झाला, हा कळीचा मुद्दा आहे. यावर आता गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. गेल्या दहा वर्षांत देशामध्ये ७५ नव्या विमानतळांची निर्मिती झाली आणि आपापसातील स्पर्धेपोटी लोकांना आकर्षित करण्यासाठी विमान कंपन्यांनी अनेक योजनाही सादर केल्या. परिणामी, विमान प्रवाशांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. वाढत्या प्रवासी संख्येमुळे एक विमान दिवसाला तीन-तीन फेऱ्या करत आहे. अशावेळी जर विमाने सुस्थितीत नसतील तर आगामी काळात अशा घटना अटळ आहेत. त्यामुळेच तपास यंत्रणांनी अधिक सतर्कतेने भान राखणे गरजेचे आहे.

Web Title : विमान सुरक्षा खतरे में: यात्रियों की जान जोखिम में, ढीली निगरानी।

Web Summary : हाल की घटनाओं से भारतीय विमानन सुरक्षा में चूक उजागर हुई। दिल्ली हवाई अड्डे पर टक्कर जैसी घटनाएं रखरखाव और निरीक्षण में विफलताएं दिखाती हैं। जांच अक्सर पायलटों को दोषी ठहराती है, एयरलाइनों को बचाती है। बढ़ते उड़ानों और हवाई अड्डे के विस्तार के साथ, आपदाओं से बचने और यात्रियों की सुरक्षा के लिए सख्त निगरानी महत्वपूर्ण है।

Web Title : Air safety compromised: Passenger lives at risk amidst lax oversight.

Web Summary : Recent incidents highlight lapses in Indian aviation safety. Close calls, like the Delhi airport collision, expose systemic failures in maintenance and oversight. Investigations often blame pilots, shielding airlines. With increasing flights and airport expansion, stricter vigilance is crucial to avert disasters and protect passengers.