Sangli: भाजपच्या नाराज पदाधिकाऱ्यांचा अजित पवार गटात प्रवेश, पडळकर गटाला धक्का 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 19:25 IST2025-06-26T19:25:13+5:302025-06-26T19:25:30+5:30

स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणूक पार्श्वभूमीवर पडळकर गटाला दणका

Workers including Pankaj Dabde from Vita, Sandeep Thombre from Khanapur, Mukesh Jagtap joined the NCP Ajit Pawar faction | Sangli: भाजपच्या नाराज पदाधिकाऱ्यांचा अजित पवार गटात प्रवेश, पडळकर गटाला धक्का 

Sangli: भाजपच्या नाराज पदाधिकाऱ्यांचा अजित पवार गटात प्रवेश, पडळकर गटाला धक्का 

विटा : भारतीय जनता पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि कुरघोड्यांना कंटाळून पदाचा राजीनामा दिलेल्या विटा येथील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. विटा येथील पंकज दबडे, खानापूरचे संदीप ठोंबरे, मुकेश जगताप यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हातात घेतले. त्यामुळे विटा शहरासह खानापूर मतदारसंघात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर गटाला मोठा धक्का बसला आहे.

पडळकर यांचे कट्टर व विश्वासू समर्थक समजले जाणारे भाजपचे जिल्हा सचिव पंकज दबडे, अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप ठोंबरे, विटा शहराध्यक्षा सौ. अर्चना दबडे यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी भाजपचा त्याग केला होता. पक्षांतर्गत कुरघोड्या व गटबाजीमुळे त्यांनी भाजपची साथ सोडल्याचे वृत्त आहे. या सर्व पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 

यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी सर्व नवीन कार्यकर्त्यांचे स्वागत करून पंकज दबडे यांच्यासह कार्यकर्त्यांच्या या प्रवेशामुळे खानापूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला बळ मिळाल्याचे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खानापूर तालुकाध्यक्षपदी पंकज दबडे, तर सामाजिक न्याय विभागाच्या सांगली जिल्हाध्यक्षपदी संदीप ठोंबरे यांची निवड झाल्याचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या सहीचे पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते प्रदान करण्यात आले.

दरम्यान, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे कट्टर व विश्वासू समर्थक असलेल्या पंकज दबडे, संदीप ठोंबरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणूक पार्श्वभूमीवर आ. पडळकर गटाला दणका बसला आहे.

Web Title: Workers including Pankaj Dabde from Vita, Sandeep Thombre from Khanapur, Mukesh Jagtap joined the NCP Ajit Pawar faction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.