Sangli: स्वस्त औषधाच्या बहाण्याने महिलेची दीड कोटींची फसवणूक, दोघांवर गुन्हा दाखल; मिरजेतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 15:54 IST2025-10-09T15:54:28+5:302025-10-09T15:54:53+5:30
संशयितांचे नाव बोगस असण्याची शक्यता

Sangli: स्वस्त औषधाच्या बहाण्याने महिलेची दीड कोटींची फसवणूक, दोघांवर गुन्हा दाखल; मिरजेतील घटना
मिरज : स्वस्त दरात औषध देण्याच्या बहाण्याने मिरजेतील औषध दुकानदार महिलेची सुमारे दीड कोटीची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी दोन भामट्यांविरूद्ध मिरज शहर पोलिस ठाण्यात मंगळवार, ७ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजयश्री सचिन उंडाळे (वय ४८, रा. ब्राह्मणपुरी, मिरज) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विजयश्री उंडाळे यांचे मिरजेत ब्राह्मणपुरीत ‘श्री’ स्वस्त औषधी दुकान आहे. सहा महिन्यापूर्वी उंडाळे यांना हर्ष तोलाणी व अरुण कुमार असे नाव सांगणाऱ्या दोघांनी त्यांच्या व्हॉट्सॲप क्रमांकवरून संपर्क साधला. उंडाळे यांना ऑनलाइन लिंक पाठवून आभासी ॲपमध्ये नोंदणी करण्यास सांगितले. या ॲपवरून स्वस्त औषधे खरेदी केल्यास अधिक नफा मिळणार असल्याचे भासवले.
उंडाळे यांनी ॲप डाऊनलोड करून त्याद्वारे औषध खरेदीसाठी रक्कम पाठवली. १३ मार्च ते ६ जून या चार महिन्यात हर्ष तोलाणी व अरुण कुमार यांनी सांगितलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यावर उंडाळे यांनी रक्कम पाठवली. त्यानंतर आणखी पैसे दिले नाहीत तर सर्व पैसे बुडतील, अशी भीती घालून उंडाळे यांच्या बँक खात्यावरून वेगवेगळ्या बँक खात्यावर ऑनलाइन पध्दतीने पैसे पाठविण्यास त्यांना भाग पाडले.
उंडाळे यांच्याकडून तब्बल एकूण १ कोटी ४३ लाख एकतीस हजार इतकी रक्कम घेतली. त्यानंतर हर्ष तोलानी व अरुण कुमार यांनी औषधे न देता फसवणूक केल्याची तक्रार उंडाळे यांनी शहर पोलिसात दिली आहे. याप्रकरणी दोघांविरूद्ध बीएनएस ३१८ आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (क), ६६ (ड) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघा संशयितांचा पोलिसांनी मोबाईल क्रमांकावरून शोध सुरू केला आहे.
संशयितांचे नाव बोगस असण्याची शक्यता
हर्ष तोलाणी व अरूण कुमार या दोन वेगवेगळ्या नावाने विजयश्री उंडाळे यांच्याशी संपर्क साधणाऱ्या भामट्यांनी फसवणुकीनंतर मोबाईल क्रमांक बंद ठेवला आहे. प्राथमिक चौकशीत दोघांनी बोगस नावांनी संपर्क साधल्याची शक्यता व्यक्त होत आहे. पोलिस दोघांचा शोध घेत आहेत.
सर्वात मोठी फसवणूक
सायबर भामट्यांकडून फसवणुकीचे अनेक प्रकार घडत आहेत. वारंवार घटना घडूनही काहीजण जाळ्यात फसत आहेत. मिरजेतील उंडाळे यांची तब्बल १ कोटी ४३ लाखांची फसवणूक झाली आहे. आजपर्यंतची सायबर भामट्यांनी केलेली ही जिल्ह्यातील मोठी फसवणूक असण्याची शक्यता आहे.