Sangli: बोरगावातील बेकायदेशीर टोलनाका कधी बंद होणार, प्रवाशांना नाहक भुर्दंड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 18:18 IST2024-12-27T18:17:29+5:302024-12-27T18:18:20+5:30

रोहित पाटील यांच्याकडून पाठपुरावा सुरू

When will the illegal toll booth at Borgaon in Sangli district on the Ratnagiri Nagpur national highway be closed | Sangli: बोरगावातील बेकायदेशीर टोलनाका कधी बंद होणार, प्रवाशांना नाहक भुर्दंड 

Sangli: बोरगावातील बेकायदेशीर टोलनाका कधी बंद होणार, प्रवाशांना नाहक भुर्दंड 

महेश देसाई

कवठेमहांकाळ : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यात बोरगाव येथे बेकायदेशीर टोलनाक्याचा भुर्दंड कवठेमहांकाळ तालुक्यातील प्रवाशांना बसत आहे. वारंवार विविध संघटनेच्या वतीने हा टोलनाका बंद करण्याच्या विरोधात आंदोलन झाले तरीही हा टोल अद्याप बंद केला नाही. उलट जोमाने सुरू आहेत. हा सुरू असलेला बेकायदेशीर टोल नाका बंद होणार तरी कधी? आमदार रोहित पाटील यांनी नागपूर येथील अधिवेशनात टोल बंद करण्याची मागणी केली. या मागणीला यश मिळणार का? असा प्रश्न कवठेमहांकाळ तालुक्यातील प्रवाशांना पडला आहे.

त्याचबरोबर तालुक्यात अपुरे रस्त्याचे कामे व अपुऱ्या उपाय योजना व सुविधा असताना तालुक्यातील बोरगाव येथे टोल वसुली मात्र जोमाने होत आहे. एकीकडे वाहनधारकांची गैरसोय होताना दिसते तर दुसरीकडे शासनाने वाहनधारकांना लुटण्यासाठी बेकायदेशीर टोलनाका ठेवला आहे. अपुऱ्या सुविधा व अपुरे रस्ते असताना टोल का घेतात? असा संताप ये-जा करणाऱ्या वाहनधारकांकडून होतो तर कवठेमहांकाळ तालुक्यातील प्रवाशांना बिनकामाचे भुर्दंड का सोसावा, असाही संताप त्यांच्याकडून व्यक्त होत आहे.

महामार्गावरचे असलेले अपुरे कामे

खरशिंग फाटा येथील उड्डाण पूल व सर्व्हिस रोड, अलकुड एम येथील सर्व्हिस रोडवरील गतिरोधक, शिरढोण येथील अग्रणी नदीवरील दोन्ही बाजूचे सर्व्हिस रोड तसेच नवीन पूल, तसेच शिरढोण येथील सर्व्हिस रोडलगतचे गावात जाणारे सर्वच रस्ते गटार करणे, कुची येथील अपूर्ण गटार सर्व्हिस रोड लगतचे गावात जाणारे सर्वच रस्ते डांबरीकरण करणे, नरसिंहगाव येथील सर्व्हिस रोडचे अपूर्ण कामे, सर्व्हिस रोड लगतचे गावात जाणारे रस्ते डांबरीकरण करणे, हायवे लगतच्या व आतील गावांच्या नावांचे फलक, शिरढोणकडून तासगावकडे जाताना महामार्गाच्या हद्दीत खड्डे आहेत. यासह अन्य किरकोळ कामे ही सर्व अपूर्ण कामे आहेत.

सांगोला तालुक्यातील अनकढाळ टोल नाक्यापासून कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव टोल नाका हा साधारण ५२ किमी अंतरावर आहे. येथे टोल नाका झाल्यामुळे याचा माझ्या मतदारसंघातील प्रवाशांना सांगली, मिरजेला जाण्यासाठी टोलचा भुर्दंड सोसावा लागत असल्याने शासनाने संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून हा टोलनाका बंद करावा, अशी मागणी नागपूर येथील अधिवेशनात केली. परंतु हा टोलनाका बंद करण्यासाठी मी पाठपुरावा करीत आहे. - आमदार रोहित पाटील

Web Title: When will the illegal toll booth at Borgaon in Sangli district on the Ratnagiri Nagpur national highway be closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.