Sangli ZP: आम्ही पालकमंत्र्यांचे ऐकलेच पाहिजे असे नाही; भाजप-राष्ट्रवादीत जुगलबंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 17:35 IST2026-02-20T17:35:22+5:302026-02-20T17:35:46+5:30

जनभावनेचा आदर करण्याची अजितराव घोरपडे यांची भूमिका, गटस्थापनेसाठी दोन दिवसांत बैठक

We don't necessarily have to listen to the Guardian Minister, BJP and NCP Ajit Pawar clash over power in Sangli Zilla Parishad | Sangli ZP: आम्ही पालकमंत्र्यांचे ऐकलेच पाहिजे असे नाही; भाजप-राष्ट्रवादीत जुगलबंदी

Sangli ZP: आम्ही पालकमंत्र्यांचे ऐकलेच पाहिजे असे नाही; भाजप-राष्ट्रवादीत जुगलबंदी

सांगली : जिल्हा परिषदेतील सत्ताकारणावरून भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्यात जुगलबंदी रंगताना दिसत आहे. भाजप महायुतीला पाठिंब्याबाबत राष्ट्रवादीत मतभेद असल्याच्या पार्श्वभूमीवर आपल्याला पाठिंबा मिळणार नाही, अशी भीती भाजपमध्ये आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपनेते, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्हीपचे अस्त्र दाखविले आहे, तर `आम्ही पालकमंत्र्यांचे ऐकलेच पाहिजे असे नाही`, अशी भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली आहे.

सत्तेचा तराजू कोणाच्या बाजूने झुकणार, याचा निर्णय शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्या भूमिकेनंतर निश्चित होणार आहे. भाजपला पाठिंब्यासाठी अध्यक्षपदाची अट घालणाऱ्या राष्ट्रवादीमध्ये आता पाठिंब्याविषयी दुमत असल्याचे संकेत मिळत आहेत. मिरजेत बुधवारी झालेल्या बैठकीत कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नाही किंबहुना परस्परविरोधी भूमिका व्यक्त केल्या. आता पक्षाच्या नेत्यांनीही स्पष्टपणेे भूमिका मांडायला सुरुवात केली आहे. `पालकमंत्र्यांचे आम्ही ऐकलेच पाहिजे असे नाही`, अशी रोखठोक भूमिका माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी `लोकमत`शी बोलताना व्यक्त केली. 

पक्षाचे सहा सदस्य निवडून आले असून, सत्तेच्या निर्णयात त्यांची भूमिका निर्णायक आहे. घोरपडे यांनी सांगितले की, `आम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्यास आघाडीचे संख्याबळ भाजपपेक्षा कितीतरी जास्त होईल. त्यामुळे पाठिंब्याच्या निर्णयाबाबत आम्ही स्वतंत्र आहोत. आम्हाला लोकभावनेचा आदर केलाच पाहिजे. व्हीपचा निर्णय आमच्याच पक्षपातळीवर होईल. पालकमंत्री सांगतात तसे होईल, असे नाही. आम्हाला मोठ्या प्रमाणात लोक येऊन भेटत आहेत. मूळ राजकीय भूमिका सोडू नका, अशी सूचना करत आहेत. कोणीतरी गळ घालेल. पण, त्याला बळी पडू नका, असेही सांगत आहेत. कार्यकर्त्यांच्या भावनेचा आम्हाला विचार केलाच पाहिजे`.

पालकमंत्र्यांना व्हीपची भाषा का करावी लागली?

राष्ट्रवादी (अजित पवार)मधील मतभिन्नता पुढे आल्यानेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना व्हीपची भाषा करावी लागल्याचे एव्हाना स्पष्ट झाले आहे. पक्षाचे नेते माजी खासदार संजय पाटील, अजितराव घोरपडे, विलासराव जगताप, शिवाजीराव नाईक यांच्यात एकमत झाले, तरच पाठिंब्याचा निर्णय होऊ शकतो. पण, तूर्त तसे चित्र नसल्याने व्हीपचा पत्ता चंद्रकांत पाटील यांना बाहेर काढावा लागल्याची चर्चा आहे.

समविचारी पक्षांसोबत आम्ही निवडणूक लढवली. आता निवडणुकीनंतर पाठिंब्याचा निर्णय घेतानाही हीच भूमिका कायम ठेवा, असे निर्देश मुंबईतील वरिष्ठांनी आम्हाला दिले आहेत. त्यामुळे आम्ही भाजप महायुतीला पाठिंबा देणार नाही, असा अर्थ त्यातून निघू शकतो. पालकमंत्र्यांचे आम्ही ऐकलेच पाहिजे, असे नाही. त्यांच्यामागे गेले पाहिजे, असेही नाही. गट स्थापना व गटनेता निवडीसाठी दोन दिवसात आमची बैठक होणार आहे. त्यामध्ये पुढील चर्चा होईल. - अजितराव घोरपडे, माजी मंत्री, राष्ट्रवादी (अजित पवार)

Web Title : सांगली ZP: NCP के विरोध से BJP में सत्ता को लेकर तनाव।

Web Summary : सांगली ZP में बीजेपी और एनसीपी के बीच सत्ता संघर्ष है। एनसीपी नेताओं ने समर्थन के संबंध में बीजेपी के निर्देशों का पालन करने की आवश्यकता पर सवाल उठाया है, जिससे संभावित गठबंधन बदलाव का संकेत मिलता है। निर्णय शिंदे सेना के रुख पर निर्भर करता है।

Web Title : Sangli ZP: NCP defiance sparks BJP tensions over power share.

Web Summary : Sangli ZP witnesses a power struggle between BJP and NCP. NCP leaders question the need to heed BJP's directives regarding support, hinting at potential alliance shifts. The decision hinges on Shinde Sena's stance.