Sangli ZP: सत्तेचे त्रांगडे सुटेना; पाठिंब्याबाबत आमचे एकमतच, राष्ट्रवादीची स्पष्टोक्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 13:45 IST2026-02-21T13:44:19+5:302026-02-21T13:45:21+5:30
'तो' त्रास कसा विसरणार?

Sangli ZP: सत्तेचे त्रांगडे सुटेना; पाठिंब्याबाबत आमचे एकमतच, राष्ट्रवादीची स्पष्टोक्ती
सांगली : जिल्हा परिषदेत कोणाला पाठिंबा द्यायचा, याबाबत आमचे एकमतच आहे. कोणतेही मतभेद नाहीत. यासंदर्भात आमच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना दोन दिवसांत भेटून माहिती देणार आहोत, अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) नेत्यांनी दिली.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
जिल्हा परिषदेत सत्तेसाठी महाविकास आघाडी किंवा भाजपा महायुती यापैकी कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने सत्तेने त्रांगडे निर्माण झाले आहे. सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिंदेसेनेची एकनाथ शिंदे भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. महायुतीकडून सत्तेसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अजित पवार गटाने त्यांना पाठिंब्याबाबत स्पष्ट होकार दिलेला नाही. किंबहुना या गटाचे नेते अजितराव घोरपडे यांनी पाठिंबा देणार नसल्याचे संकेत गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना दिले होते.
दुसरे नेते, माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनीही शुक्रवारी बोलताना घोरपडे यांच्याशी सहमती दर्शवली. त्यामुळे अजित पवार गटाचा कल महाविकास आघाडीकडे दिसत आहे. गटाचे नेते दोन दिवसांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे भेट घेणार आहेत.
सत्तेसाठी भाजप महायुतीला एक जागा कमी पडत आहे. त्यासाठी शिंदेसेना आणि अजित पवार गटाला सोबत घ्यावे लागणार आहे. यासाठी गेल्या काही दिवसांपासून आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक अजित पवार गटाने काही ठिकाणी महाविकास आघाडीशी समझोता करून लढली आहे. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी आघाडीसोबत जावे लागेल, असा सूर नेत्यांमधून उमटत आहे. अजितदादा पवार पक्षाकडे सहा सदस्य आहेत.
'तो' त्रास कसा विसरणार?
भाजपसोबत आघाडीबाबत शिंदेसेनेच्या नेत्यांचाही विरोध आहे. निवडणुकीत झालेला त्रास कसा विसरणार? अशी भूमिका आमदार सुहास बाबर यांनी घेतली आहे. त्यामुळे भाजपसोबत जाऊ नये, असा सूर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधून उमटत आहे.
अजितराव घोरपडे यांच्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत. कार्यकर्त्यांच्या सूचनांचाही विचार केला पाहिजे. अनेक वर्षे त्यांच्या मदतीनेच आम्ही राजकारण केले आहे. त्यामुळे निवडणुकीनंन्तर वेगळी भूमिका घेऊन चालणार नाही. दोन दिवसांत आम्ही नेत्यांना भेटून म्हणणे सांगणार आहोत. - शिवाजीराव नाईक, माजी मंत्री