'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 15:50 IST2025-08-16T15:49:47+5:302025-08-16T15:50:45+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी आज विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.

'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
सांगली- उपमुख्यमंत्री अजित पवार आज सांगली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी इस्लामपूर येथील महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ. एन. डी. पाटील विधी महाविद्यालय, श्रीमती सरोज नारायण पाटील (माई) मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि प्रा. डॉ. एन. डी. पाटील बहुउद्देशीय सभागृहाच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थिती लावली. या कार्यक्रमात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील, भाजपाचे मंत्री चंद्रकातदादा पाटील एकाच व्यासपीठावर होते. यावेळी आमदार जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात विरोधकांना राजकीय टोले लगावले.
यावेळी आमदार जयंत पाटील यांनी पक्षांत्तरावरुन राजकीय टोले लगावले. 'हा तालुका झुकणार नाही, भूमिका बदलणार नाही, हेच वाळवा तालुक्याचे वैशिष्ट्य आहे, सहजा सहजी वाकत नाही, घाबरून जात नाही. कितीही फंदफितुरी झाली तरी इथली माणसं स्वाभिमानाने राहतात, असंही पाटील म्हणाले.
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
स्वातंत्र्य सैनिकांनी स्वाभिमानाने रहायला शिकवलं
"मला वाटतं हा तालुका एन. डी. पाटलांची जी प्रवृत्ती होती, जी पर्सनॅलिटी होती, ती वाळवा तालुक्याचा एकंदर स्वभाव काय आहे हीच सांगणारी होती. मी दोन्ही दादांना सांगू इच्छितो हा तालुका हा फार स्वाभिमानी लोकांचा तालुका आहे, या तालुक्याला फार मोठी स्वातंत्र्यसैनिकांची परंपरा आहे. क्रांतिसिंह नाना पाटील याच तालुक्यातले आहेत, नागनाथ अण्णा नायकवडी, पांडू मास्तर, बाबूजी पाटणकर देखील याच तालुक्याचे आहेत, अशी असंख्य यादी मोठी आहे. ज्यांनी संघर्ष करताना कधीही माघार घेतली नाही. या वाळवा तालुक्याचे हेच सगळ्यात मोठे वैशिष्ट्य आहे, कदाचित भारतातील सगळ्या तालुक्यांपेक्षा जास्त वाळवा तालुका वेगळा आहे असे मी मानतो, असंही पाटील म्हणाले.
"तुम्हाला असा तालुका सापडणार नाही. यांच्यात लढाईची प्रवृत्ती आहे. ही लढाई शेवटच्या निकरापर्यंत करायची हे एनडी पाटलांनी दाखवून दिलं, हा या तालुक्याचा आदर्श आहे. म्हणून हा आमच्या तालुक्याचा प्रोब्लेम पण आहे, सहजासहजी वाकत नाही, सहजा सहजी शरण जात नाही. लढाई करायची असेल तर ती कितीही फंदफितुरी झाली तरी जे आहेत त्यांना सोबत घेऊन लढायचे. हे एनडी पाटलांपासून सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांनी आम्हा सगळ्यांना शिकवले आहे. हा आमचा स्वाभिमान आहे, असंही आमदार जयंत पाटील म्हणाले.