Sangli Crime: विट्यात तरुणाच्या खूनप्रकरणी मिरजेच्या दोघांना अटक, अनैतिक संबंधाच्या संशयावरून कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 19:20 IST2025-11-24T19:19:10+5:302025-11-24T19:20:48+5:30
एक अल्पवयीन संशयितही ताब्यात

Sangli Crime: विट्यात तरुणाच्या खूनप्रकरणी मिरजेच्या दोघांना अटक, अनैतिक संबंधाच्या संशयावरून कृत्य
विटा : नात्यातील एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून व त्या महिलेला दिलेले उसने पैसे परत मागतिल्याच्या रागातून साई गजानन सदावर्ते (वय २९, रा. साळशिंगे रोड, विटा) या रिक्षाचालक तरुणाच्या खूनप्रकरणी विटा पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने दोघांना अटक केली. अमीर नजीर फौजदार (वय २८, रा. माणिकनगर, मिरज) या मुख्य संशयितासह रोनक सूरज रजपूत (वय २०, रा. समतानगर, मिरज) या दोघांना अटक केली. तर तिसरा अल्पवयीन संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले.
विटा येथील साळशिंगे रस्त्यावरील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राजवळ रिक्षाचालक साई सदावर्ते याच्यावर शनिवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास तीन अज्ञातांनी कोयत्याने हल्ला करून त्याचा खून केला होता. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले होते. या घटनेनंतर पोलिस उपअधीक्षक विपुल पाटील, पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली संशयितांच्या तपासासाठी पथके रवाना झाली होती. त्यावेळी हा खून मिरज येथील अमीर फौजदार याच्यासह अन्य दोन अनोळखी तरुणांनी केल्याची व सर्व हल्लेखोरांनी मायणी रस्त्याने पलायन केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यावेळी वडूज पोलिसांच्या मदतीने विटा पोलिसांनी मुख्य संशयित अमीर फौजदार यास गोपूज (ता. खटाव) येथून अटक केली. तर त्याचा दुसरा साथीदार रोनक रजपूत यास स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने सातारा येथून अटक केली. या घटनेतील तिसरा अल्पवयीन संशयितास पोलिसांनी तासगाव येथून ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन संशयितांसह तिघांना १२ तासांच्या आत अटक केली. याप्रकरणी मयत साई सदावर्ते याची पत्नी पूजा साई सदावर्ते यांनी विटा पोलिसांत फिर्याद दिली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे करीत आहेत.
मुख्य संशयितांकडून खुनाची कबुली
या घटनेतील मुख्य संशयित अमीर फौजदार याची पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने माझ्या नात्यातील एका महिलेशी साई सदावर्ते याचे अनैतिक संबंध असल्याचा मला संशय होता. तसेच त्याने तिला दिलेले उसने पैसे तो परत मागत होता. त्यामुळे त्याचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली.