Sangli Accident: शेगावजवळ कंटेनर-दुचाकीच्या अपघातात दोघे ठार, भावाच्या डोईवर अक्षता टाकण्याचे स्वप्न भंगले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 14:56 IST2025-12-05T14:55:28+5:302025-12-05T14:56:37+5:30
Sangli Accident: ओव्हरटेक करताना झाला अपघात

Sangli Accident: शेगावजवळ कंटेनर-दुचाकीच्या अपघातात दोघे ठार, भावाच्या डोईवर अक्षता टाकण्याचे स्वप्न भंगले
जत : पंढरपूर-अथणी राष्ट्रीय महामार्गावरील शेगावच्या हद्दीत प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर गुरुवारी दुपारी साडे तीन वाजता कंटेनर व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. कामन्ना संगाप्पा हत्तळी (वय २५, मूळ रा. चिकलगी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) व सचिन गणेश व्हनमाने (वय २१, रा. शेगाव, ता. जत) अशी मृत तरुणांची नावे आहेत.
याबाबत जत पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. घटनेनंतर जत पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह जत ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आले होते.
पोलिसांकडून व घटनास्थळी मिळालेली अधिक माहिती अशी की, कामन्ना हत्तळी व सचिन व्हनमाने हे दोघेही कंटेनर चालक आहेत. त्यांना माल पोहचविण्यासाठी चेन्नईला जायचे होते. मात्र, मयत हत्तळी याच्या मोठ्या भावाचे शुक्रवारी गावी लग्न असल्याने त्याने मित्र व्हनमाने याला कंटेनर घेऊन चेन्नईला जाण्यास सांगितले. माल भरलेला कंटेनर शेगाव येथील पंपावर होता. त्यामुळे हत्तळी यांनी व्हनमाने यास दुचाकीवर बसविले व कंटेनरजवळ सोडण्यासाठी ते निघाले. दोघे दुचाकीवरुन शेगावहून पेट्रोलपंपावर जाण्यासाठी निघाले होते.
दरम्यान, जतहून सांगोल्याच्या दिशेने एक कंटेनर निघाला होता. शेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर या कंटनेरला ओव्हरटेक करताना समोरुन येणाऱ्या दुसऱ्या कंटेनरला धडकून झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ पंचनामा करून मृतदेह जत ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यासाठी दाखल केले होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत जत पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते. अधिक तपास जत पोलिस करत आहेत.
भावाच्या डोईवर अक्षता टाकण्याचे स्वप्न भंगले
हत्तळी याचे कुटुंब मंगळवेढा तालुक्यातील चिकलगीचे. मृत कामन्ना याच्या मोठ्या भावाचे शुक्रवारी ५ डिसेंबरला जाडरबोबलाद (ता. जत) लग्न होते. त्यामुळे कामन्ना याने सुटी घेत शिगावहून जाडरबोबलादला जाण्याची तयारी केली होती. भावाच्या डोईवर अक्षता टाकण्याचे स्वप्न रंगविले होते. मात्र, अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. लग्नघरात शोककळा पसरली.
कंटेनरचालकांचा कंटेनरनेच घेतला जीव
दोघेही तरुण कंटेनरचालक होते. मात्र, अपघात घडला तेव्हा ते दुचाकीवर होते. त्यांच्या वाहनाला एका कंटेनरनेच धडक दिली अन् दोघांचा जीव गेला. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.