Sangli Accident News: ताबा सुटून कार दुभाजकावर आदळली, ईश्वरपूरजवळ अपघातात दोघे ठार; लहान मुलासह महिला जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 13:28 IST2026-03-10T13:28:10+5:302026-03-10T13:28:39+5:30
अपघातामुळे काहीकाळ वाहतूक ठप्प

Sangli Accident News: ताबा सुटून कार दुभाजकावर आदळली, ईश्वरपूरजवळ अपघातात दोघे ठार; लहान मुलासह महिला जखमी
ईश्वरपूर : ईश्वरपूर - सांगली रस्त्यावरील तुजारपूर (ता. वाळवा) गावच्या हद्दीतील हनुमान मंदिर परिसरात मोटारीवरील ताबा सुटून ती रस्ते दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात दोघे ठार झाले. तर एक लहान मुलगा व महिला जखमी झाली. हा अपघात सोमवारी सकाळी १० च्या सुमारास झाला.
राजाराम शिवाजी पाटील (वय ७०) व स्वप्नाली सागर पाटील (वय ३५, दोघे रा. बोरगाव, ता. वाळवा) अशी मृतांची नावे आहेत. तर रियांश पाटील (वय ५) आणि मनीषा पाटील (वय ६५, बोरगाव) अशी जखमींची नावे आहेत. या दुर्घटनेमुळे बोरगाव गावात हळहळ व्यक्त होत होती. जखमींवर ईश्वरपूर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
राजाराम पाटील हे आपली मोटार (एमएच १० - डीएल ४८४७) घेऊन घरातील इतरांसमवेत आष्टा येथील नातेवाइकांकडे निघाले होते. सकाळी १० च्या सुमारास तुजारपूर गावच्या हद्दीतून जात असताना भरधाव वेगात मोटार चालविताना रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष झाल्याने मोटारीवरील त्यांचा ताबा सुटून ती रस्ते दुभाजकावर आदळली. त्यामध्ये स्वप्नाली पाटील या जागीच ठार झाल्या. तर राजाराम पाटील व इतर दोघे गंभीर जखमी झाले.
अपघातस्थळावरून जाणाऱ्या नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना देत जखमींना उपचारासाठी हलवले. या अपघातामुळे सांगली रस्त्यावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करीत अपघातग्रस्त वाहन बाजूला केले. दरम्यान, रुग्णालयात उपचार सुरू असताना राजाराम पाटील यांचे निधन झाले. दोन्ही मृतांच्या डोक्यास व छातीवर, पोटावर जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताबाबत प्रकाश बाळासाहेब पाटील (बोरगाव) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.