घरफोडी करणाऱ्या दोन बांगलादेशींना सांगलीत अटक, १२ लाखांचा ऐवज जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 19:39 IST2026-03-18T19:37:45+5:302026-03-18T19:39:01+5:30
सांगली : बेकायदेशीररित्या भारतात वास्तव्यास राहून घरफोड्या करणाऱ्या दोन बांगलादेशी चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. आरोपींकडून ...

घरफोडी करणाऱ्या दोन बांगलादेशींना सांगलीत अटक, १२ लाखांचा ऐवज जप्त
सांगली : बेकायदेशीररित्या भारतात वास्तव्यास राहून घरफोड्या करणाऱ्या दोन बांगलादेशी चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. आरोपींकडून १२ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांनी पाच घरफोड्यांची कबुली दिली आहे.
हिमेल फरमान सोनार (वय ३५) आणि पोरोश शोयदुल चोकदार (वय २७, दोघे रा. रुस्तमनगर, कॉलेजपारा, ता. पारबतीपुरा, जि. दिनाजपूर, रंगपूर विभाग, बांगलादेश) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्या पथकाने घरफोडी करणाऱ्या संशयितांचा शोध सुरू केला होता. दरम्यान, मंगळवारी पोलिसांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दोन संशयित चोरीचे सोन्या-चांदीचे दागिने विक्रीसाठी झुलेलाल मंदिर परिसरातून कोल्हापूर रोडकडे जाणार आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी झुलेलाल मंदिर परिसरात सापळा रचला. तेथे दुचाकीजवळ थांबलेल्या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपली ओळख सांगितली.
अंगझडतीत हिमेल सोनार याच्याकडून सोन्याचे दागिने, मोबाईल, बांगलादेशी ओळखपत्र व रोख रक्कम तर पोरोश चोकदार याच्याकडील सॅकमध्ये चांदीचे दागिने आढळून आले. दोघांकडे भारतात राहण्याचा कोणताही वैध परवाना नसल्याचे उघड झाले. आरोपींना जप्त मुद्देमालासह पुढील तपासासाठी सांगली शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पोवार व त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
पडक्या इमारतीत वास्तव
संशयित हिमेल फरमान सोनार, पोरोश शोयदुल चोकदार हे दोघे गेल्या दीड वर्षापासून मिरज रेल्वे स्थानकाजवळील पडक्या इमारतीत राहत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटल परिसर, संजयनगर, तासगाव व पलूस येथे बंद घरांचे कडीकोयंडे तोडून चोरी केल्याची कबुलीही त्यांनी दिली.