Sangli flood: दारू पिऊन पूर पाहणाऱ्या तिघा हुल्लडबाजांना चोप, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 19:14 IST2025-08-22T19:13:53+5:302025-08-22T19:14:55+5:30
जिल्हा दंडाधिकारी यांनी आयर्विन पूल, सरकारी घाट, स्वामी समर्थ घाट याठिकाणी शंभर मीटर परिसरात मनाई आदेश जारी केला

छाया-नंदकिशोर वाघमारे
सांगली : मध्यरात्रीच्या सुमारास दारूच्या नशेत आयर्विन पुलावर पाण्याची पातळी पाहण्यास येऊन हुल्लडबाजी करणाऱ्या तिघांना पोलिसांनी चोप दिला. संशयित अमोल वसंत निकम (वय ४६, रा. शामरावनगर), संदीप दीपक देशमुख (४२, रा. तिसरी गल्ली, रामनगर), धनंजय शैलेश भोसले (२६, रा. गावभाग) या तिघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कृष्णा, वारणेला पूर आला असून कृष्णा इशारा पातळीवरून वाहत आहे. पुराचे पाणी पाहण्यासाठी काही नागरिक गर्दी करत आहेत. पुराच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा दंडाधिकारी यांनी आयर्विन पूल, सरकारी घाट, स्वामी समर्थ घाट याठिकाणी शंभर मीटर परिसरात मनाई आदेश जारी केला आहे. त्यानुसार शंभर मीटर परिसरात विनाकारण फिरणे, वावरणे, फोटो सेशन, व्हीडिओ बनविणे, रिल्स, सेल्फी आदी बाबींना मनाई केली आहे. तसेच परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.
बुधवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास संशयित अमोल निकम, संदीप देशमुख, धनंजय भोसले हे तिघेजण मनाई आदेश असलेल्या आयर्विन पुलाजवळ दारू पिऊन आले. त्यांनी हुल्लडबाजी, दंगा करण्यास सुरूवात केली. पोलिसांनी विचारणा केल्यानंतर पाणी पाहण्यास आल्याचे उद्धटपणे उत्तर दिले. पोलिसांनी काठीने चोप देऊन शहर पोलिस ठाण्यात आणले. पोलिस कर्मचारी विष्णू बंडगर यांनी तिघांविरूद्ध फिर्याद दिली.
जिल्हाधिकारी यांनी पुराच्या ठिकाणी मनाई आदेश जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी पूर पाहण्यास गर्दी करू नये. प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात येईल. - संजय मोरे, पोलिस निरीक्षक, शहर पोलिस ठाणे.