सांगलीत ‘धूम स्टाइल’ने केलेल्या चोरीचा अवघ्या तासात छडा, चालकाने टीप दिल्याने साथीदाराकडून चोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 16:24 IST2025-05-03T16:24:30+5:302025-05-03T16:24:53+5:30
१५ लाखांचे दागिने जप्त, चर्चा मात्र ४० तोळ्यांची

सांगलीत ‘धूम स्टाइल’ने केलेल्या चोरीचा अवघ्या तासात छडा, चालकाने टीप दिल्याने साथीदाराकडून चोरी
सांगली : येथील कर्मवीर चौकातील पतसंस्थेच्या दारातून वृद्धाचे १३ तोळे सोन्याचे दागिने धूम स्टाइलने लंपास करणाऱ्या चोरट्यास अवघ्या तासाभरात विश्रामबाग पोलिसांनी गुरुवारी अटक केली. चालकानेच टीप दिल्यामुळे साथीदाराने दागिने चोरल्याचे तपासात स्पष्ट झाले. चोरटा अमोल महेश माने (वय ३०, रा. शिवपार्वती कॉलनी, हरिपूर, ता. मिरज) व चालक नितेश रामचंद्र गजगेश्वर (वय २९, रा. झाडातला मारुतीमागे, हरिपूर रस्ता, सांगली) या दोघांकडून १५ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पाटबंधारे विभागातील निवृत्त अभियंता धनचंद्र भाऊराव सकळे (वय ८७, रा. कृष्णा हॉस्पिटलसमोर, पत्रकारनगर) यांनी लग्नकार्यानिमित्त कर्मवीर पतसंस्थेत ठेवलेले दागिने घरात आणले होते. १ मे रोजी सुटी असल्यामुळे शुक्रवारी ते दागिने पतसंस्थेच्या लॉकरमध्ये ठेवण्यासाठी मोटारीतून सकाळी १०:०० वाजेच्या सुमारास ते निघाले. तत्पूर्वी, मोटारीचा चालक नितेश गजगेश्वर याने सकळे यांना घेऊन दागिने ठेवण्यास पतसंस्थेत जायचे असल्याचे ऐकले होते. त्याने साथीदार अमोल माने याला टीप दिली. त्यानुसार अमोल माने हा दुचाकी (एमएच १० एएस ४९३५) वरून त्यांच्या मागावर होता.
चालक नितेश याने सकाळी १०:१५ वाजता मोटार कर्मवीर पतसंस्थेसमोर थांबवली. सकळे त्यातून खाली उतरल्यानंतर नितेश मोटार पुढे घेऊन गेला. तेवढ्यात मागून आलेल्या अमोल माने याने सकळे यांच्या हातातील दागिन्यांची पिशवी हिसडा मारून ताब्यात घेतली. त्यानंतर काही सेकंदांत तो शंभरफुटीच्या दिशेने पळाला. सकळे यांनी आरडाओरड करून काही अंतरावर गेलेल्या चालक नितेशला थांबवले. त्यानंतर मोटारीतून त्यांनी चोरट्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला; परंतु चोरटा पसार झाला होता.
सकळे यांनी पतसंस्थेत येऊन हा प्रकार सांगितला. त्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटले. तत्काळ विश्रामबाग पोलिसांना प्रकार कळवला. उपअधीक्षक विमला एम., पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव आणि पथक घटनास्थळी दाखल झाले. तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. हा प्रकार टीप देऊन केला असल्याची शक्यता वाटल्याने चालक नितेशला ताब्यात घेऊन चौकशी केली. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासावरून अमोल माने याला ताब्यात घेतले. तेव्हा सर्व उलगडा झाला. दोघांनी मिळून कट रचल्याचे स्पष्ट झाले. चोरीचे दागिने अमोल याने मालवाहू टेम्पोमध्ये ठेवले होते. ते जप्त केले.
प्रभारी अधीक्षक रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक भालेराव, सहायक निरीक्षक कविता नाईक, उपनिरीक्षक सुजाता भोपळे, कर्मचारी विशाल भिसे, संदीप साळुंखे, बिरोबा नरळे, अमर मोहिते, प्रशांत माळी, योगेश पाटील, आर्यन देशिंगकर, महंमद मुलाणी, गणेश बामणे, उमेश कोळेकर आदींच्या पथकाने कारवाई केली.
रेल्वे पोलिसमध्ये भरती होणार होता
अमोल माने हा रेल्वे पोलिस दलात भरतीची तयारी करत होता. त्याने परीक्षा दिली होती; परंतु चारित्र्य पडताळणीमध्ये काही तांत्रिक अडचण निर्माण झाली. त्यामुळे त्याने ‘मॅट’मध्ये धाव घेतली होती. तत्पूर्वी, पैशाच्या अडचणीमुळे त्याने चोरी केली; परंतु पहिल्याच प्रयत्नात तो सापडला.
चर्चा मात्र ४० तोळ्यांची
सकळे यांना पत्नीने दागिने लॉकरमध्ये ठेवण्यास सांगितले होते. त्यामुळे ते दागिन्यांची पिशवी घेऊन बाहेर पडले; परंतु बरेच दागिने त्यांच्या पत्नीच्या अंगावर राहिले. दागिने चोरीस गेल्यानंतर त्यांना ४० तोळे दागिने गेले, असे वाटले. पोलिसांना तसे सांगितलेही; परंतु नंतर चौकशीत उर्वरित दागिने घरीच राहिल्याचे समजले.