मिरज पॅटर्नचे कारभारी ‘राष्ट्रवादी’त एकवटले; काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी, भाजपसमोर आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 19:25 IST2025-12-18T19:24:38+5:302025-12-18T19:25:17+5:30
मिरज : महापालिका स्थापनेपासून कार्यरत व कायम सत्तेत असणाऱ्या बहुचर्चित मिरज पॅटर्नचे कारभारी यावेळी राष्ट्रवादी अजितदादा गटात एकवटले आहेत. ...

मिरज पॅटर्नचे कारभारी ‘राष्ट्रवादी’त एकवटले; काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी, भाजपसमोर आव्हान
मिरज : महापालिका स्थापनेपासून कार्यरत व कायम सत्तेत असणाऱ्या बहुचर्चित मिरज पॅटर्नचे कारभारी यावेळी राष्ट्रवादी अजितदादा गटात एकवटले आहेत. प्रत्येक निवडणुकीत नवा पक्ष, नवा नेता व नवे सत्ता केंद्र असा मिरज पॅटर्नचा कारभार आहे. मिरज पॅटर्नचे कारभारी काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट व भाजपसमोर आव्हान उभे करणार आहेत.
तत्कालीन नगरपालिका व महापालिकेत मिरजेच्या कारभाऱ्यांचे मिरजेत आमचा कोणी नेता नाही, आम्हीच आमचे नेते असे धोरण आहे. यामुळे आवटी, जामदार, नायकवडी ही घराणी आणि त्यांच्यासोबत येणारे नगरसेवक, नगरसेविका म्हणून महापालिकेत प्रवेश करीत आहेत. महापालिकेत सत्ता कोणाचीही असो मिरज पॅटर्नमधील मंडळी एकत्र येऊन आपल्या पद्धतीने कारभार करण्याची परंपरा आहे.
केंद्रात, राज्यात व महापालिकेतही सत्ताधारी भाजपचे महापालिकेत सर्वाधिक जागा लढविण्याचे मनसुबे आहेत. मात्र राष्ट्रवादी अजितदादा गटात माजी नगरसेवकांची संख्या वाढणार असल्याने महायुतीत जागावाटप करताना भाजपची अडचण होणार आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी भाजप-महायुतीला महापालिकेत रोखण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र महाविकास आघाडीतील माजी नगरसेवक अजितदादा गटात प्रवेशासाठी सरसावले आहेत.
मिरज पॅटर्नमधील मंडळी त्यांच्या पक्षाला आव्हान देण्यासाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीत एकवटली आहेत. निवडणुकीचा निकालानंतर जर कोणत्या पक्षाला जागा कमी पडल्यास दोघांनाही सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी तर आमच्याशिवाय पर्याय नाही, असा मिरज पॅटर्नचा पवित्रा असू शकतो. आतापर्यंतचा इतिहास पाहता अशी परिस्थिती येऊ शकते. त्यामुळे नव्या सत्तासमीकरणात मिरज पॅटर्नची डोकेदुखी सत्ताधाऱ्यांना सहन करावी लागणार आहे.
मग शहर एवढे बकाल कसे?
मिरजेला आतापर्यंत सहावेळा महापौर पद मिळाले, मात्र त्याचा मिरजेच्या विकासासाठी फायदा झाला नाही. मिरज पॅटर्नमुळे त्यातील कारभाऱ्याचेच भले झाले. अजित पवार यांना भेटण्यासाठी गेलेल्या या मिरजेतील कारभाऱ्यांना अजित पवार यांनी चारवेळा तुम्ही निवडून आला, मग मिरज शहर एवढे बकाल कसे असा सवाल केल्यानंतर ही मंडळी निरुत्तर झाली. बारामती शहर बघा, शहर सुधारा असेही त्यांना बजावले. मिरजेत मतदारांना विकासाचे गाजर दाखविणारी ही मिरज पॅटर्नमधील मंडळी मिरजेच्या विकासासाठी एकत्र येत नाहीत.