सांगली : आरटीओ अधिकाऱ्यांनी दंडाची पावती केल्यामुळे ट्रॅव्हलर चालकाने गाडी रस्त्यातच आडवी लावली. चालकाला ‘सपोर्ट’ म्हणून दोन चालकांनी दोन्ही बाजूंनी ट्रक उभे करून रस्ताच बंद केला. त्यामुळे शनिवारी रात्री माधवनगर रस्ता पूर्ण बंद झाला. अनेकांनी पावती फाडणाऱ्या आरटीओ निरीक्षकांना घेराव घातला. ट्रॅव्हलर चालक व त्याच्या सहकाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे तासभर वाहतूक कोंडी झाली होती. शेकडो वाहनधारक त्रस्त झाले. अखेर शहर पोलिसांनी घटनास्थळी येऊन कोंडी फोडली. यावेळी पोलिसांनी काही हुल्लडबाजांना काठीने चोप दिला. त्यानंतर गर्दी हटली.सांगलीतील ट्रॅव्हलर (एमएच ०४ जीपी ६२८)च्या चालकाकडे बॅच नसल्यामुळे आणि गाडीला ‘डॅझलिंग लाइट’ असल्यामुळे आरटीओ निरीक्षकांनी माधवनगर रस्ता परिसरात शनिवारी रात्री कारवाई केली. आरटीओ निरीक्षक व सहायक महिला अधिकारी यांनी ही कारवाई केल्यानंतर ट्रॅव्हलर चालकाने वेगळाच पवित्रा घेतला. माझ्या गाडीत प्रवासी नसताना तुम्ही पावती का केली? असा जाब विचारला. आरटीओ अधिकाऱ्यांनी रितसर कारवाई केल्याचे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, चालक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने दंगा करण्यास सुरुवात करत ट्रॅव्हलर रस्त्यातच आडवी लावली. या चालकाला पाठिंबा म्हणून दोघा ट्रक चालकांनी बाजूला गाड्या लावल्या. त्यामुळे रस्ता पूर्णपणे अडवला गेला. दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या. वाहनधारकांना नेमके काय झाले समजेना. तेवढ्यात ट्रॅव्हलर चालकाचे समर्थक गोळा झाले.ट्रॅव्हलर चालकासह इतरांनी आरटीओ अधिकाऱ्याला घेराव घालून जाब विचारण्यास सुरूवात केली. काहींनी मोबाइल काढून त्यांना कारवाई का केली ते सांगा म्हणून बोलण्यास सांगितले. अधिकारी एकटेच असल्यामुळे ते गोंधळले. परंतु, या सर्व गोंधळात दोन्ही बाजूंनी येणाऱ्या वाहनांची चांगलीच कोंडी झाली. रात्री नऊच्या सुमारास सुरू झालेला हा प्रकार जवळपास तासभर सुरू होता. दोघांच्या वादात शेकडो वाहनधारकांना नाहक त्रास होऊ लागला. अखेर सांगली शहर पोलिसांना हा प्रकार समजताच, त्यांनी घटनास्थळी तातडीने येऊन गर्दी हटवली.
रुग्णवाहिका देखील अडवलीदिवंगत नेते मदनभाऊंच्या पुतळ्यासमोर रस्त्यावर ट्रॅव्हलर चालकामुळे कोंडी झाल्यानंतर वाहने अडकून पडली. त्याचवेळी एका रुग्णास घेऊन येणारी रुग्णवाहिका देखील अडवली. त्यामुळे रुग्णवाहिकेला पर्यायी मार्गाने जावे लागले.
ट्रक चालकांवर कारवाई हवीट्रॅव्हलर व आरटीओ अधिकारी यांच्यातील वादात दोन ट्रक चालकांनी मध्यस्थी करत दोन्ही बाजूला वाहने लावली. त्यामुळे वाहतूक थांबली. या दोन ट्रक चालकांवर देखील कारवाई करण्याची मागणी अनेक त्रस्त वाहनचालकांनी केली.
Web Summary : In Sangli, an RTO fine led to a massive traffic jam. A traveler driver blocked the road, supported by truckers, causing chaos. Police intervened, dispersing the crowd and restoring order after an hour of disruption. Hundreds were inconvenienced.
Web Summary : सांगली में, आरटीओ जुर्माने के कारण भारी जाम लग गया। एक ट्रैवलर चालक ने सड़क अवरुद्ध कर दी, जिसे ट्रक चालकों का समर्थन मिला, जिससे अराजकता फैल गई। पुलिस ने हस्तक्षेप कर भीड़ को तितर-बितर किया और एक घंटे बाद व्यवस्था बहाल की। सैकड़ों लोग परेशान हुए।