सांगलीत शेरीनाल्याचे मैलामिश्रीत पाणी थेट कृष्णा नदीत, प्रदूषण नियंत्रण विभागाचे डोळे कधी उघडणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 16:06 IST2026-03-14T16:05:42+5:302026-03-14T16:06:02+5:30

महापालिकेच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा संताप 

The polluted water of Sherinalaya flows directly into the Krishna River in sangli | सांगलीत शेरीनाल्याचे मैलामिश्रीत पाणी थेट कृष्णा नदीत, प्रदूषण नियंत्रण विभागाचे डोळे कधी उघडणार?

सांगलीत शेरीनाल्याचे मैलामिश्रीत पाणी थेट कृष्णा नदीत, प्रदूषण नियंत्रण विभागाचे डोळे कधी उघडणार?

सांगली : शहरातील शेरीनाल्यातील मैलामिश्रीत सांडपाणी सांगलीतील अमरधाम स्मशानभूमीजवळ थेट कृष्णा नदीत मिसळत असल्याचा गंभीर प्रकार पुन्हा एकदा उघड झाला आहे. महापालिका प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ, याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. संतप्त नागरिकांनी महापालिका प्रशासनाचे डोळे कधी उघडणार, असा सवाल उपस्थित केला आहे.

महापालिका क्षेत्रातील गावभागातील अमरधाम स्मशानभूमीजवळील नाल्यातून मोठ्या प्रमाणात सांडपाणी कृष्णा नदीत मिसळत असल्याचे प्रत्यक्ष पाहणीत उघड झाले. शुक्रवार, दि. १३ मार्च रोजी सकाळी सुमारे साडेअकरा वाजण्याच्या सुमारास येथे पाहणी करण्यात आली असता, नाल्याचा उजव्या बाजूचा भाग फुटलेला दिसून आला. त्या ठिकाणाहून मैलामिश्रीत पाणी थेट नदीत वाहत होते. परिणामी, नदीचा मोठा भाग पांढऱ्या फेसाने भरलेला दिसत होता. प्रदूषित पाणी पुढे बंधाऱ्याच्या दिशेने वाहत असल्याने नदीपात्राचे गंभीर प्रदूषण होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

विशेष म्हणजे, शेरीनाल्यातील सर्व पंप कार्यान्वित करण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून वारंवार केला जात असला, तरी प्रत्यक्ष परिस्थिती त्याच्या पूर्णपणे विरोधात असल्याचे दिसून येत आहे. नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांनी या प्रकाराबाबत अनेकदा तक्रारी करूनही महापालिका प्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

प्रदूषणास जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा : रवींद्र वळवडे

सृष्टी संवर्धन फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र वळवडे यांनी या गंभीर प्रकाराची दखल घेत, शुक्रवारी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. संबंधित ठिकाणी तातडीने स्थळ पाहणी करून सांडपाणी नदीत मिसळण्याचे कारण शोधून त्यावर त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे. कृष्णा नदीचे प्रदूषण रोखण्यात अपयशी ठरलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

Web Title : सांगली में सीवेज कृष्णा नदी को प्रदूषित कर रहा है; अधिकारियों ने अनदेखा किया।

Web Summary : सांगली में शेरीनाला से अनुपचारित सीवेज सीधे कृष्णा नदी में प्रवेश कर रहा है, जिससे गंभीर प्रदूषण हो रहा है। शिकायतों के बावजूद, नगरपालिका और प्रदूषण नियंत्रण बोर्ड कार्रवाई करने में विफल रहे हैं, जिससे सार्वजनिक आक्रोश और जवाबदेही की मांग बढ़ रही है।

Web Title : Sewage pollutes Krishna River in Sangli; authorities ignore the issue.

Web Summary : Untreated sewage from Sherinala is directly entering the Krishna River near Sangli's Amar Dham, causing severe pollution. Despite complaints, the municipality and pollution control board have failed to act, sparking public outrage and calls for accountability.