निकृष्ट जेवण दिल्याची तक्रार, संस्थाचालकांकडून विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण; सांगली जिल्ह्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 11:57 IST2025-07-18T11:56:54+5:302025-07-18T11:57:20+5:30

संतप्त पालकांचा शाळेबाहेर गोंधळ : संस्थाचालकांविरोधात पोलिसांत तक्रार

The institution's management brutally beat up students for complaining about poor quality food being served in sangli | निकृष्ट जेवण दिल्याची तक्रार, संस्थाचालकांकडून विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण; सांगली जिल्ह्यातील घटना

छाया : महेश देसाई

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यातील अलकुड (एम) फाट्यावर असलेल्या मोहन माळी इंटरनॅशनल स्कूलमध्ये संस्थाचालकांनी विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. संतप्त पालकांनी शाळेसमोर एकत्र येत घोषणाबाजी केली. संस्थाचालकांविरोधात तक्रार दाखल करण्याची मागणी पोलिसांकडे करण्यात आली.

शाळेतील विद्यार्थ्यांना खराब जेवण देण्यात येत असल्याची तक्रार काही विद्यार्थ्यांनी केली होती. तक्रारी केल्या म्हणून शाळेचे संस्थाचालक मोहन माळी यांनी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याची पालकांची तक्रार आहे. याच कारणावरून गुरुवारी दुपारी संतप्त पालकांनी शाळेच्या आवारात मोहन माळी यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला.

मुलांना ताब्यात देण्याची मागणी करत पालकांनी संस्थाचालकांवर गुन्हा नोंद करण्याची मागणी पोलिसांना केली. मारहाण केल्याप्रकरणी संस्थाचालक मोहन माळी यांच्याविरोधात कवठेमहांकाळ पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

याबाबत घटनास्थळावरून व पालकांकडून मिळालेली माहिती अशी की, मोहन माळी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये मुंबई, पुण्यासह अन्य जिल्ह्यांतील अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना निकृष्ट अन्न दिले जात असल्याची तक्रार विद्यार्थी करीत होते. तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिवीगाळ करून मारहाण केली जात आहे.

ही बाब समजताच गुरुवारी दुपारी मुंबई, पुणे येथून २२ मुलांच्या पालकांनी शाळा गाठली. मुलांना ताब्यात घेत, शाळेतून प्रवेश रद्द करत त्यांनी कवठेमहांकाळ पोलिस ठाणे गाठले. माळी यांच्यावर रात्री गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

शाळा परिसरात बंदोबस्त

घटनास्थळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कवठेमहांकाळ पोलिसांनी शाळेत बंदोबस्त तैनात केला होता. यावेळी सर्व पालकांना पोलिसांनी शांत राहण्याचे आवाहन केले.

रिपाइंचा आंदोलनाचा इशारा

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे तालुकाध्यक्ष पिंटू ऊर्फ बाळासाहेब माने यांनी मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांसह पालकांची भेट घेतली. संस्थाचालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही माने यांनी दिला.

Web Title: The institution's management brutally beat up students for complaining about poor quality food being served in sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.