प्रेयसीशी भेट होत नसल्याने नैराश्यातून शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय, सांगलीतील बेळुंखी येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 13:30 IST2023-03-16T13:30:19+5:302023-03-16T13:30:48+5:30
पोलिसांच्या चौकशीत आत्महत्येमागील खरे कारण समजले

प्रेयसीशी भेट होत नसल्याने नैराश्यातून शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय, सांगलीतील बेळुंखी येथील घटना
जत : प्रेयसी बाहेरगावी गेल्यामुळे तिची भेट होऊ शकत नसल्याच्या नैराश्यातून श्रीकांत आबासाहेब शिंगाडे (वय ३५, रा. बेळुंखी, ता. जत) या विवाहित शेतकऱ्याने विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली.
श्रीकांत शिंगाडे विवाहित असून, गावात कुटुंबासोबत राहत होते. मंगळवारी रात्री शेतात त्यांचा मृतदेह आढळून आला. जवळच कीटकनाशकाची बाटली पडली होती. नातेवाईकांनी पोलिसांना कळवले. शिंगाडे यांनी कर्जास कंटाळून आत्महत्या केली असावी, असा अंदाज पहिल्यांदा व्यक्त करण्यात आला होता. मात्र त्यांचे कोठेही कर्ज प्रकरण नसल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांच्या चौकशीत आत्महत्येमागील खरे कारण समजले.
शिंगाडे यांचे नात्यातीलच एका महिलेशी संबंध होते. मात्र ती बाहेरगावी राहण्यास गेल्याने तिची भेट होत नव्हती. त्यातून त्यांना नैराश्य आले होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
शिंगाडे यांचा मृतदेह मध्यरात्री विच्छेदनासाठी जत येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. पहाटे विच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री उशिरा जत पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली. मृत श्रीकांत शिंगाडे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, लहान मुलगा, मुलगी असा परिवार आहे.